Pune News : परदेशी शिक्षणाचे गणित बिघडले
esakal March 24, 2026 09:45 AM

प्रज्वल रामटेके

पुणे : परदेशात उच्च शिक्षण घेऊन करिअरला नवी दिशा देण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर डॉलर आणि पाउंडच्या वाढत्या दराने पाणी फेरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या मूल्यात झालेली ऐतिहासिक घसरण आणि परदेशी चलनाच्या उसळीमुळे पुण्यासह देशातील मध्यमवर्गीय विद्यार्थी आणि पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ऐनवेळी लाखो रुपयांची जादा सोय कशी करायची, या प्रश्नाने ते चिंताग्रस्त झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या दरात घसरण होत आहे. सध्या एका अमेरिकन डॉलरची (युएसडी) किंमत ९३.५७ रुपये इतकी, तर ब्रिटिश पाउंडची (जीबीपी) किंमत १२५.०२ रुपये इतकी झाली आहे. परदेशी चलन महागल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि राहण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. विनिमय दरातील फरकामुळे डॉलर किंवा पाउंड खरेदी करण्यासाठी अधिक रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे १० ते २० हजार डॉलरची फी भरण्यासाठी आधीच्या तुलनेत आता एक ते दोन लाखांची अतिरिक्त तजवीज करावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत, त्यांच्या पालकांनाही या घसरणीचा फटका बसत आहे. याविषयी सुधीर देशपांडे म्हणाले, ‘‘माझा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्याला दर महिन्याला घरभाडे आणि इतर खर्चासाठी पैसे पाठवावे लागतात. पाउंड १२५ रुपयांवर गेल्याने माझ्या मासिक आर्थिक नियोजनामध्ये १० ते १२ हजारांची वाढ झाली आहे. नोकरदाराला हा अतिरिक्त भुर्दंड परवडणारा नाही.’’

शैक्षणिक कर्ज पडतेय अपुरे

परदेशी शिक्षणासाठी बहुतांश विद्यार्थी बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेतात. अनेक विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपूर्वीच जुन्या विनिमय दरानुसार कर्जाची रक्कम मंजूर करून घेतली आहे. मात्र, चलन महागल्यामुळे विद्यापीठाची फी भरताना मंजूर कर्जाची रक्कम अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांना अचानक उर्वरित रकमेची सोय करावी लागत आहे, किंवा बँकेकडे टॉप-अप कर्जासाठी धाव घ्यावी लागत आहे.

विद्यार्थ्यांवर परिणाम

  • एक ते दोन लाख रुपये शैक्षणिक शुल्कात वाढ

  • मासिक १० ते १२ हजार रुपये अधिक भार

  • परदेशी शिक्षण महाग

  • मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण

काय बदलले?

  • रुपयाची घसरण

  • परदेशी चलन महाग

  • शिक्षण आणि राहणीमान खर्चात वाढ

कर्जाची समस्या

  • आधी मंजूर कर्ज अपुरे

  • टॉप-अप कर्जाची गरज

  • भविष्यात ईएमआय आणि व्याजाच्या रकमेत वाढ

मी अमेरिकेतील एका विद्यापीठात प्रवेश निश्चित केला असून, चार महिन्यांपूर्वी शैक्षणिक कर्जही मंजूर झाले आहे. पण आता डॉलरचे दर वाढल्याने मला फी आणि प्रवास खर्चासाठी आणखी दीड लाख रुपये भरावे लागणार आहेत. ऐनवेळी हे वाढीव पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे.

- रोहित कदम, विद्यार्थी

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीची रक्कम ठरावीक आहे. परदेशी चलनामध्ये वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त भुर्दंड स्वतःच्या खिशातून सोसावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आगाऊ फी अदा करण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील.

- कुलदीप आंबेकर, संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्था

मी ‘युके’मधील एका विद्यापीठात शिक्षण घेत असून, मला राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे. तेव्हा पाउंडचा दर १२१ रुपये होता. मात्र, प्रत्यक्ष फी भरताना दरात वाढ झाल्याने मला ५० ते ६० हजारांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागला. राज्य सरकारने ही रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या माझ्या विद्यापीठात महाराष्ट्रातील सुमारे एक हजार विद्यार्थी शिकत आहेत. चलनातील या तफावतीचा मोठा फटका आम्हा सर्वांना बसत आहे.

- जान्हवी शेलार, विद्यार्थिनी (युके)

माझे सुरुवातीला पदव्युत्तर शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये जाण्याचे नियोजन होते. मात्र, पाउंडचे दर गगनाला भिडल्याने तिथला राहण्याचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे मी जर्मनीमधील विद्यापीठांचा पर्याय शोधत आहे, कारण तेथे शिक्षण आणि राहण्याचा खर्च तुलनेने कमी आहे.

- स्नेहा जोशी, विद्यार्थिनी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.