पु ल देशपांडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे ‘कोट्या’धीश; फडणवीसांकडून ठाकरेंचं कौतुक
Marathi March 24, 2026 09:25 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या व्यक्तिमत्वात राजकारणाची कमी आहे, त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. कोणताही निर्णय घेताना ते परिणामांची चिंता करत नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुल देशपांडे यांच्यानंतर जर कुणी ‘कोट्या’धीश म्हणावे तर मी ते उद्धव ठाकरे यांना म्हणेन असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली. विधान परिषदेतील नऊ सदस्य हे निवृत्त होत असून त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांच्या निरोपाच्या भाषणावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

स्वभावात राजकारण कमी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धवजी यांचा निरोप समारंभ करत आहोत. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतो. त्याच्यापलीकडे देखील एक नात असतं. उद्धवजी यांच्यासोबत अनेक वर्षे आम्ही राहिलो आहोत. उद्धवजी यांचा स्वभाव आहे त्यात राजकारण कमी आहे. त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. त्यामुळे ते अनेकवेळा निर्णय घेतात, त्यामुळे अनेकवेळा वेगळी परिस्थिती निर्माण होते. बाळासाहेब ठाकरे यांचा देखील तसा स्वभाव होता. एकदा निर्णय ठरला की तो घेऊन टाकायचा. राजकारणात एखादा निर्णय घेताना त्याच्या परिणामाची चिंता कधीही केले नाही.”

उद्धव ठाकरे हे चांगले छायाचित्रकार असून महाराष्ट्राच्या विविध छटा त्यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केल्या ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘माझा विठ्ठल’ हे त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांचं संवेदनशील मन समोर येतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

परिणामांची चिंता केली नाही

राजकारणात ते लवकर आले, पण 2010 नंतर आमची जास्त जवळीक आली. मैत्रीची भावना आमच्यात त्यावेळी निर्माण झाली. आता देखील आहे, मात्र राजकीय भूमिका आता आमच्या वेगळ्या झाल्या. त्यांनी एखादा निर्णय घेताना कधीही परिणामाचा विचार केला नाही. ज्याला राजकीय चेहरा नाही अशा सर्वसामान्यांना राजकीय चेहरा देण्याच काम त्यांनी केलं. एकनाथ शिंदे देखील तसेच आहेत, राज्यसभा निवडणुकीवेळी त्याची प्रचीती आली.

उद्धव ठाकरेंच्या कोट्या ऐकायला मिळोत

बाळासाहेबांनी सर्वसामान्य चेहऱ्यांना संधी देत अनेकाना मोठं केलं. तीच परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवलं. पुल देशपांडे यांना ‘कोट्या’धीश म्हणतात. मात्र पुलं यांच्यानंतर जर कुणाला ‘कोट्या’धीश असं म्हणावं तर ते मी उद्धव ठाकरेंना म्हणेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या सहा वर्षांच्या काळात त्यांच्या सभागृहातील कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या. पण जर पुढे या सभागृहात तुम्ही आला तर तुमच्या जास्त कोट्या ऐकायला मिळाव्यात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंना उत्तम आरोग्य मिळो, त्यांना मनापासून शुभेच्छा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.