पुणे ः अनैतिक संबंधामुळे इमारतीतील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या कारणावरून महिलेसमोरच मारहाण केल्याच्या रागातून गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीस एम. के. महाजन यांनी हा निकाल दिला.
संजय अनंत मोहोळ (वय ३९, रा. दत्तवाडी) आणि संभाजी सदाशिव कांबळे (वय २७, रा. कोथरूड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना जन्मठेपेसह २७ हजारांचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल असे निकालात नमूद आहे.
सागर शिंदे (वय ३१, रा. कर्वे रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. ते एरंडवणे येथील एका गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष होते. या प्रकरणी, त्याचे वडील शिवाजी शिंदे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिंदे यांच्या सोसायटीतील महिलेशी संजय याचे अनैतिक संबंध होते. त्याचा येथील रहिवाशांना त्रास होत होता. खुनाच्या घटनेच्या दीड वर्षांपूर्वी सागर याने संजय याला समजावीत त्या महिलेसमोर लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. तसेच, संभाजी यास संजयची संगत सोडण्याची ताकद दिली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सागर हे दुचाकीवरून करिष्मा चौकाकडे निघाले होते. यावेळी, आरोपींनी चारचाकीतून येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. रस्त्यावर पडल्यानंतर सागर आरोपींना पाहून त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागले. आरोपींनी पाठलाग करत त्यांच्यावर कोयत्याने वार तसेच दगडाने ठेचून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी, अलंकार पोलिसांच्या वतीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी १८ साक्षीदार तपासले. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, दोन डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
वडिलांना दिली होती आरोपींची माहिती ः
सागर यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचे वडील शिवाजी यांच्याकडे मृत्युपूर्व जबाब देवून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले होते. यावेळी, न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज, पंच, साक्षीदार तसेच तपासी आधिकाऱ्यांचा जबाब याआधारे आरोपीला दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, दंडाच्या रक्कमेतून सागर यांच्या वडील व मुलांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात नमूद आहे.