उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
वेदांत नेब March 25, 2026 02:13 AM

मुंबई : विधान परिषदेच्या नऊ आमदारांच्या निरोप समारंभात एकाच फ्रेममध्ये आलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. फोटोसेशनदरम्यान दोघेही एकत्र बसले असले तरी एकमेकांकडे न पाहता त्यांनी अंतर कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. नियोजित वेळेपेक्षा सुमारे दोन तास उशिराने हे फोटोसेशन पार पडले. सुरुवातीला विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे पायऱ्यांवर आल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित झाले.

MLA Farewell Event : आमदारांच्या निरोप समारंभात रंगले फोटोसेशन

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात सभापती राम शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र फोटोसेशनसाठी आले. इतर आमदार आधीच उपस्थित असल्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. फोटोसेशनमध्ये राम शिंदे मध्यभागी बसले होते. त्यांच्या एका बाजूला एकनाथ शिंदे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे बसल्याचे चित्र दिसले.

Uddhav Thackeray Eknath Shinde Political Distance : फोटोसेशननंतरही कायम दुरावा

फोटोसेशन संपताच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे त्वरित उठले आणि एकमेकांकडे न पाहता वेगवेगळ्या दिशांना वळल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे हे शंभूराजे देसाई आणि नीलम गोऱ्हे यांच्यासोबत संवाद साधताना दिसले. तर उद्धव ठाकरे हे राम शिंदे, प्रवीण दरेकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत चर्चा करत होते. काही मिनिटांतच एकनाथ शिंदे विधानभवनातून बाहेर पडले, तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत फोटो काढले.

Devendra Fadnavis : नियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थिती

या फोटोसेशनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, सभागृहातील भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दालनात भेट घेत सुमारे 15-20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण घटनेत एकाच मंचावर येऊनही शिंदे-ठाकरे यांच्यातील राजकीय दुरावा कायम असल्याचं पुन्हा दिसून आलं. 

या आधी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले होते. त्यावेळी नीलम गोऱ्हेंची खुर्ची या दोघांच्या मध्ये होती. त्यावेळीही हे दोघे एकमेकांसमोर येऊनही कोणताही संवाद झाला नव्हता. आताही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलं. 

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.