पिंपरी ः शहरातील खानावळचालकांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे. अनेकांना सेवा अर्धवट सुरू ठेवणे भाग पडले आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून काही ठिकाणी यापेक्षा जास्त मूल्य मोजावे लागत असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, बहुतांश विद्यार्थ्यांना दिवसातून एकदाच दोन पोळ्या आणि एका भाजीवरच जेवण भागवावे लागत आहे.
पिंपरी चिंचवडमधील अनेक खानावळी आणि भोजनालयामध्ये दररोज शेकडो विद्यार्थी व नोकरदार जेवतात. संत तुकारामनगर, निगडी, रावेत, खराळवाडी, वल्लभनगर, मासुळकर कॉलनी आणि मोरवाडी परिसरातील खानावळींची संख्या जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक सिलिंडर मिळणे कठीण झाल्याने खानावळ चालक अडचणीत सापडले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची काळ्या बाजारातील किंमत २ ते ३ हजार रुपये आहे.
सर्वाधिक फटका स्पर्धा परीक्षार्थ्यांना
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थी खानावळी आणि परवडणाऱ्या हॉटेलवरच अवलंबून असतात. रविवारी खानावळ बंद असल्याने ते हॉटेलमध्ये जेवतात; मात्र सध्या बरीच हॉटेल बंद आहेत, तर बहुतांश ठिकाणी मर्यादित सेवा दिली जात आहे. परिस्थितीचा सामना करत खासगी सदनिका आणि खासगी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीक साहित्याचा वापर सुरु केला आहे.
महिला कामगारांचीही कमतरता
चुलीवर काम करण्यासाठी लागणाऱ्या महिला कामगारांचीही कमतरता भासत आहे. बहुतेक महिलांना गॅसवर स्वयंपाक करण्याची सवय असल्याने चुलीवर पोळ्या किंवा भाकरी बनवणे कठीण जाते. काही खानावळ चालकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय वापरण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावर पोळ्या करताना तव्याचे तापमान योग्य राखणे कठीण जात असल्याने स्वयंपाकात अडचणी येत आहेत.
खराळवाडीतील एका खानावळ चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. घरगुती गॅसही तीन ते चार पट महाग मिळत आहे. या परिस्थितीत अनेक खानावळ चालकांनी मेन्यू कमी करून विद्यार्थ्यांना केवळ मसालेभात किंवा साधे जेवण देत आहोत. काही ठिकाणी रात्रीचे जेवण बंद केले आहे.
गॅस टंचाईमुळे खानावळ बंद असल्याने विद्यार्थी इलेक्ट्रिक इंडक्शनवर ’मॅगी’ किंवा ’खिचडी’ करून दिवस काढत आहोत. हॉटेलमध्ये २५ रुपयांना मिळणारे पोहे आता ३५ रुपयांना घ्यावे लागत आहेत. वाढत्या खर्चामुळे मेन्यू कमी केले आहेत. परीक्षेमुळे गावी घरी परत जाणे अवघड झाले आहे.
- गणेश जानकर, विद्यार्थी