भविष्यवेध : उच्च शिक्षण की कौशल्य विकास?
esakal March 25, 2026 08:45 AM

प्रा. विजय नवले - करिअर मेंटॉर

आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांपुढे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, उच्च शिक्षण घ्यावे की थेट कौशल्य विकासाकडे वळावे? पारंपरिक विचारसरणीनुसार पदवी, पदव्युत्तर शिक्षण म्हणजे यशाचा मार्ग मानला जातो. परंतु बदलत्या काळात केवळ पदवी पुरेशी ठरत नाही, हे वास्तवही तितकेच स्पष्ट झाले आहे.

उच्च शिक्षण विद्यार्थ्याला सखोल ज्ञान, विश्लेषण क्षमता आणि व्यापक दृष्टी देते. या शिक्षणामुळे करिअरला एक मजबूत पाया मिळतो आणि दीर्घकालीन स्थैर्याची संधी निर्माण होते. मात्र, फक्त पदवी घेतली म्हणजे नोकरी हमखास मिळेल, ही समजूत आता कालबाह्य ठरत आहे.

याच ठिकाणी कौशल्य विकासाची गरज अधोरेखित होते. उद्योगजगताला ‘काम करणारा माणूस’ हवा आहे, फक्त ‘डिग्री असलेला’ नव्हे. कम्युनिकेशन, डिजिटल स्किल्स, तांत्रिक कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता, टीमवर्क ही कौशल्येच विद्यार्थ्याला वेगळे ठरवतात. अनेक वेळा अल्पकालीन कौशल्याधारित कोर्सेसमुळे विद्यार्थी लवकर रोजगारक्षम होऊ शकतो आणि स्वतःचा व्यवसायही उभा करू शकतो.

कौशल्य कुणी शिकावे?

शिक्षण झाल्यावर नोकरी मिळाली की ती टिकविण्यासाठी आता अधिक शिक्षणापेक्षा कुशलता असणे आवश्यक असते. सॉफ्टवेअर इंजिनिअर एमटेक किंवा पीएचडी असण्यापेक्षा कामात तल्लख असला पाहिजे. जे काम दिले ते उत्तम करणार असाल तर पारंपरिक उच्च शिक्षणापेक्षा कौशल्याधिष्टित कोर्सेस उपयुक्त ठरतात. कॉमर्स करणारा विद्यार्थी अकाऊंटिंग, फायनान्शिअल ॲनालिसिस, फिनटेक करिअर्सकडे वळणे अपेक्षित आहे. आपल्या कामासंदर्भात सॉफ्टवेअर वापराची कौशल्ये जमली पाहिजेत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने संबंधित शाखेसंदर्भातील तांत्रिकी कोर्सेस करावेत. आवड असल्यास आपल्या शाखेला पूरक संगणकीय कौशल्ये शिकल्यास नोकरी मिळणे सोपे होईल. आयटीआय झालेला युवक त्याच्या अनुभवातून कुशलता प्राप्त करतो. ॲनिमेशन, ग्राफिक डिझाईन करणाऱ्यांनी उच्च शिक्षणापेक्षा कौशल्य काबीज करायला हवे. व्यवसाय करण्यासाठी उच्चशिक्षणापेक्षा व्यावसायिक कौशल्ये लाभदायक असतात. एका विशिष्ट मर्यादेनंतर अजून शिक्षण घेण्यापेक्षा कामातील कुशलता, व्यावसायिक कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स वगैरे पूरक कौशल्ये आलीच पाहिजेत.

उच्च शिक्षण कुणी घ्यावे?

संशोधन, अध्यापन क्षेत्र यासाठी स्वाभाविकपणे उच्च शिक्षण म्हणजेच मास्टर्स, पीएचडी अशाप्रकारचे शिक्षण अपरिहार्य असते. आपल्या पदवीच्या विषयांसंदर्भात हे शिक्षण असते. कधी कधी मोठ्या जबाबदाऱ्या आणि जास्त पगाराच्या नोकऱ्या यासाठी मास्टर्सपर्यंतचे शिक्षण केल्यास श्रेयस्कर ठरते. व्यवस्थापन क्षेत्रात जायचे आहे त्याला उच्च शिक्षण घ्यावेच लागते. स्पेशलायझेशन पाहून जिथे काम मिळते तिथे उच्च शिक्षण करावेच लागते. अगदी वैद्यकीय क्षेत्रात स्पेशलायझेशननंतर सुपर स्पेशलायझेशन आवश्यक ठरते. इथे कौशल्य महत्त्वाचेच आहे परंतु त्याआधी उच्चशिक्षण हवे असते. मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी, बीसीए अशा शिक्षणानंतर उच्च शिक्षण हवेच असते. डिप्लोमा इंजिनिअरिंगनंतर डिग्री करण्याचा हल्ली प्रघात आहे.

मात्र स्पर्धापरीक्षांना सामोरे जायचे आहे त्यांना केवळ पदवी पुरेशी असते. आपल्या शिक्षणापेक्षा अन्य क्षेत्रात जाणाऱ्यानेही उच्चशिक्षण करणे गरजेचे नाही. म्हणजेच कार्यक्षेत्राच्या उपयुक्ततेनुसार आणि आपल्या ध्येयांप्रमाणे हा निर्णय घ्यावा लागतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.