ढिंग टांग : पोहऱ्यात तेच आडात..!
esakal March 25, 2026 08:45 AM

स्थळ : अज्ञात. वेळ : वेषांतराची. पात्रे : घुश्शात.

नानासाहेब : (हळूवार आवाजात) ऐका ना भाईसाहेब!

भाईसाहेब : (एक ना दोन…) च्युइं..च्याँय…च्युम…चक!

नानासाहेब : (समजल्यासारखं) बरं बरं! समजलं!!

भाईसाहेब : (वैतागून खुलासा करत) मी काही बोललोच नाही, तर काय समजलं? मी च्युइंगम खातोय!

नानासाहेब : (चतुराईनं) तेच समजलं!!

भाईसाहेब : (घुश्शात) तुम्ही बोलू नका माझ्याशी! आता जे काही बोलणं होईल ते दिल्लीत!!

नानासाहेब : (समजूत घालत) अहो, असं रागावू नका, भाईसाहेब! आपली युती आहे, भांड्याला भांडं लागणारच!एकमेकांमध्ये मिटवून टाकावं!

भाईसाहेब : (हट्टानं) दिल्ली!!

नानासाहेब : (सामंजस्याचा सूर लावत) एवढुसं साताऱ्याचं भांडण, थेट दिल्लीपर्यंत कशाला न्यायचं? आपण मिटवू की आपसात!!

भाईसाहेब : तुम्ही हे असं करायला नको होतं! ऐन साताऱ्यात तुम्ही माझा कार्यक्रम केला, मग आपल्या दोस्तीला काय अर्थ उरला?

नानासाहेब: (चाणक्याच्या पवित्र्यात) युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सगळं क्षम्य असतं, भाईसाहेब! जे आडात तेच पोहोऱ्यात आलं! चालायचंच!!

भाईसाहेब : मी दिल्लीला जाऊन तक्रार करणार आहे! आम्ही तुमची एवढी बाजू घेतो, तुम्ही आमचाच करेक्ट कार्यक्रम करता! तोही साताऱ्यात? हे काही बरोबर नाही!

नानासाहेब : (रदबदली करत) तुम्ही गुवाहाटीला गेला होता, तेव्हा-

भाईसाहेब : (घाईघाईने) ते जुनं झालं!! उकरुन कशाला काढता? अशानं उद्या ठाण्यात आमचा कुणी राष्ट्रीय कार्यक्रम केला तर आम्ही कुठं जायचं?

नानासाहेब : (घोडं दामटत) मैं हूं ना? तुम्ही उठाव केला, तेव्हा तुम्हाला कोणी शक्ती दिली होती? तुमच्या हाताखाली अडीच तीन वर्ष मी उपकारभारी म्हणून निमूटपणाने काढली होती ना? दिल्लीला नेऊन तुम्हाला पहिल्यांदा महाशक्तीची ओळख कोणी करुन दिली?

भाईसाहेब : (हुंदका आवरत आवेगानं) म्हणून साताऱ्यात आमचा असा सूड घेतला का?

नानासाहेब : असा दिल टाकू नका, भाईसाहेब!

भाईसाहेब :माझ्या माणसांना डोळ्यांदेखत बगलेत हात घालून कांद्याच्या पोत्यासारखा उचलून नेला, नशीब. काटा नाही लावला…आमची दोन माणसं-

नानासाहेब : (धोरणीपणानं) राजकारण असंच असतं! कधी दोन दिले, दोन घेतले..!

भाईसाहेब : (तावातावाने) साताऱ्यात तुम्ही दोनच घेतले…हा…हा…हा लोकशाहीचा खून आहे, खून! मर्डर!! तीनशेदोनची केस आहे ही!! याला काय लॉ अँड ऑर्डर म्हणतात?

नानासाहेब : (निरागसपणे) मला काही कल्पनाच नव्हती हो! मी बघतो काय करायचं ते!!

भाईसाहेब : (संतापून) ते काही नाही! या लोकशाहीच्या खुनाला जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे! नामदाराला बगलेत हात घालून झोळणा करुन नेतात म्हंजे काय? कसं दिसलं असेल? छे, मला मेल्याहून मेल्यासारखं झालं…

नानासाहेब : अशी ही साताऱ्याची तऱ्हा, असं म्हणायचं आणि गप्प बसायचं! आपण पेरलं तेच उगवलं! काय करणार?

भाईसाहेब : (चिडून) मी काय पेरलं?

नानासाहेब : बनो मत! तुम्ही पेरलेलंच उगवलंय!!

भाईसाहेब : शेवटी तुम्ही माझ्यावरच बिल फाडताय? कमाल झाली!! मी काय पेरलं?

नानासाहेब : तुमच्या सातारा जिल्ह्यात तुम्ही शेतकऱ्यांना कसली लागवड करायला सांगता? तुमच्या शेतात काय पेरता?

भाईसाहेब : (गोंधळून) बरंच काय काय लावतो! चिकू, पेरु, स्ट्राबेरी!! त्याचं काय?

नानासाहेब : (विजयी हास्य करत) अहो, सोपं उत्तर आहे- बांबू!!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.