13 वर्षांची प्रतीक्षा, मौन अन् वेदना… हरीश राणांची हृदयद्रावक कहाणी आता मोठ्या पडद्यावर? निर्मात्यांनी घेतली वकिलांची भेट
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 25, 2026 09:43 AM

Harish Rana Biopic: कधी कधी वास्तवातील कथा कोणत्याही सिनेमाच्या कथेपेक्षा काळीज पिळवटणाऱ्या असतात. अशीच एक काळजात चर्रर्र करणारी कहाणी, गाझियाबादमधल्या (Ghaziabad News) 31 वर्षांच्या हरिश राणाची. 13 वर्षांपासून कोमात असलेला हरिश राणा (Harish Rana) जीवन आणि मृत्यू यांच्यात झगडत होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानं 32 वर्षांच्या हरीश राणाला (Harish Rana) 'निष्क्रिय इच्छामरणाची' (Passive Euthanasia) परवानगी दिली. भारताच्या न्यायव्यवस्थेतील हा एक अत्यंत ऐतिहासिक आणि संवेदनशील निकाल मानला जातोय. इतकंच काय तर, निकाल देताना न्यायमूर्तीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

हरीश राणाची 13 वर्षांची संघर्षमय कहाणी सध्या देशभर चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयानं 'पॅसिव्ह यूथेनेशिया'ला परवानगी दिल्यानंतर त्यांच्या जीवनाचा शेवटचा टप्पा सुरू झाला आणि हरीश राणा अखेरच्या प्रवासाला निघाला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सिनेमा बनवण्याचीही चर्चा रंगू लागली आहे. मुंबईतील एका लेखक-निर्मात्यानं यावर आधारित सिनेमा बनवण्यात स्वारस्य व्यक्त केलं असून, या संदर्भात त्यांनी हरीश राणाचे वकील मनीष जैन यांच्याशी चर्चाही केल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या प्रकरणाचं संवेदनशील स्वरूप पाहता, त्यांना तूर्तास काही काळ थांबण्यास सांगण्यात आलं आहे.

एम्स रुग्णालयात शेवटची प्रक्रिया जारी (Harish Rana Inspirational Real Life Story)

सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर, हरीश राणाला दिल्लीतील एम्स (AIIMS) इथल्या पॅलिएटिव्ह केअर वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलंय. इथे, त्याच्या वेदना कमी करण्याच्या उद्देशानं त्याला टप्प्याटप्प्यानं वेदनामुक्तीची प्रक्रिया केली जात आहे. अलिकडेच, त्याला व्हेंटिलेटर आणि इतर लाइफ सपोर्टिंग इक्विपमेंट काढून एका सामान्य बेडवर हलवण्यात आलं आहे.

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, हरिशला पाणी देणं आधीच बंद करण्यात आलं आहे. फीडिंग ट्यूबला कॅप लावण्यात आली आहे आणि कृत्रिम पोषण देखील थांबवण्यात आलंय. दरम्यान, त्याला जास्त त्रास होऊ नये, याची खात्री करण्यासाठी आवश्यक औषधं देणं सुरू आहे. प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा अत्यंत सावधगिरीनं पार पाडला जाईल, याची खात्री करण्यासाठी मेडिकल बोर्डचा विस्तारही 5 वरून 10 सदस्यांपर्यंत करण्यात आला आहे.

कुटुंबाचा मोठा अन् भावनिक निर्णय (Harish Rana Case)

हरीश राणाच्या वडिलांनी घेतलेला निर्णय या प्रकरणाला अधिक भावनिक बनवतो. त्यांनी आपल्या मुलाचं अंगदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 वर्ष मुलाला अशा अवस्थेत पाहणं कोणत्याही कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक असतं. मात्र, या कठीण काळातही राणा कुटुंबानं धैर्य सोडलेलं नाही.

एका अपघातानं 13 वर्ष अंथरुणाला खिळला हरिश (Harish Rana Life Story)

हरीश राणा  2013 मध्ये चंदीगडमध्ये विद्यार्थी असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून  पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली आणि तो गेली 13  वर्षे व्हेजिटेटिव्ह स्टेट (Vegetative State) मध्ये होता. हरीश गेल्या 13 वर्षांपासून कोमात होता. त्याच्या डोक्यातील नसाही सुकल्या होत्या. आपल्या मुलाला या अवस्थेत पाहू न शकल्यामुळे त्याच्या वृद्ध पालकांनी त्याचे 'लाइफ सपोर्ट' (Life support) काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली  होती, परंतु त्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली ही  भारतातील पहिलीच घटना ठरली आहे.

Dhurandhar 2: धुरंधर2 चा 'तो' सीन अन् आर माधवनला शीख समाजाची माफी मागावी लागली, Video पोस्ट करत म्हणाला...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.