करिअरमंत्र : फॅशन डिझाइन क्षेत्रात संधी
esakal March 25, 2026 09:45 AM

प्रतीक्षा वाघ - प्राध्यापिका

फॅशन डिझाइन नावीन्यपूर्ण क्षेत्र आहे. यात सध्याच्या जीवनशैलीशी निगडीत फॅशनेबल ड्रेसचे डिझाइन केले जाते. यामध्ये कापड निवडणे, डिझाइन तयार करणे, नवीन फॅशन ट्रेंड्सनुसार बदल करणे यांचा समावेश असतो. जागतिक बाजारपेठेत डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे या क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे फॅशन डिझाइनमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत.

नोकरीच्या संधी

फॅशन डिझाइन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने खासगी क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. यात फॅशन ब्रँड्स, कपड्यांचा उद्योग, मीडिया, ई-कॉमर्स आणि चित्रपट क्षेत्राचा समावेश होतो. आदित्य बिर्ला, रिलायन्स, रेमंड, फॅबइंडिया आणि मिंत्रा यासारख्या कंपन्यांमध्ये डिझायनर, स्टायलिस्ट आणि मर्चंडायझर म्हणून काम करण्याची संधी मिळते. तसेच, सरकारी क्षेत्रातही काही संधी उपलब्ध आहेत, जसे की वस्त्र मंत्रालय, हँडलूम संस्था इत्यादी. शिकवण्याची आवड आहे, ते पुढील शिक्षण घेऊन प्रशिक्षक म्हणूनही करिअर करू शकतात.

उच्च शिक्षण

पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेऊन आपले कौशल्य वाढवता येते. ते फॅशन टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल डिझाइन किंवा फॅशन कम्युनिकेशनमध्ये मास्टर ऑफ डिझाइन (एम.डिझ.) करू शकतात किंवा फॅशन मॅनेजमेंटमध्ये व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए) करू शकतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, लंडन कॉलेज ऑफ फॅशन आणि पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइन यांसारख्या चांगल्या संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते. फॅशन डिझाइनमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचीही संधी असते, उदा ः स्वतःचा ब्रँड सुरू करणे किंवा स्टायलिस्ट म्हणून काम करणे. तसेच, परदेशात काम करणे आणि पर्यावरणपूरक फॅशनमध्ये नवीन कल्पना आणणेही शक्य आहे.

फॅशन डिझाइन केवळ नवीन ड्रेसच्या निर्मितीपुरते मर्यादित नाही; हा सर्जनशीलता, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि उद्योजकतेची भावना यांना सहजतेने एकत्र आणणारा व्यवसाय आहे. परिपूर्ण शिक्षण, उत्तम कौशल्ये आणि नवनिर्मितीची आवड यामुळे, हे क्षेत्र महत्त्वाकांक्षी डिझाइनर्सना फायदेशीर आणि आश्वासक करिअरचा मार्ग उपलब्ध करून देते.(समाप्त)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.