Gold Silver Rate नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या 9 दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीला मोठा ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात 5.5 टक्क्यांची म्हणजेच 12000 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा एक किलोचा दर 236137 रुपयांवर पोहोचला आहे. तर, सोन्याच्या दरात 4 टक्क्यांची वाढ झाली असून 5500 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर 144434 रुपये 10 ग्रॅमवर पोहोला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार डॉलर कमजोर झाल्यानं, युद्ध संपण्यांचे संकेत निर्माण झाल्यानं आणि क्रूड ऑईलचे दर कमी झाल्यानं सोन्याच्या दरात 2.1 टक्क्यांची वाढ होऊन 4568.29 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. एप्रिलच्या डिलिव्हरीसाठी अमेरिकेच्या सोन्याच्या वायद्याचा दर 4569.40 डॉलर प्रति औंस झाला आहे. चांदीच्या दरात 3.8 टक्क्यांची वाढ होऊन दर 73.94 डॉलर प्रति औंस झाला आहे.
सोने आणि चांदीच्या दरातील वाढ अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता निर्माण झाल्यानं झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड टमर्प यांनी आखाती देशातील संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक मार्ग शोधला जात असल्याचं म्हटलं. लवकरच उच्च स्तरावरील शांतता चर्चा होऊ शकते, असं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. इराणकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार सोन्यातील तेजीमागं आणखी एक कारण आहे. कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि डॉलर कमजोर होणं आहे. डॉलर निर्देशांक जवळपास 0.2 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळं सोन्याच्या गुंतवणूकदारांना याचा फायदा झाला आहे.
सोन्याच्या दरात तेजी आली असली तर बाजारात अनिश्चितता कायम आहे. इराणची अद्याप होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पकड आहे. अमेरिकेनं 2000 सैनिक आखाती देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा साधनांच्या दरात वाढ झाल्यानं महागाई वाढण्याचं संकट निर्माण झालं आहे.
मार्च महिन्यात सोन्याच्या दरात 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. युद्धामुळं क्रूड ऑईलचा दर 120 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचला होता.
रिपोर्टनुसार काही केंद्रीय बँकांनी चलन वाचवण्यासाठी सोन्याची विक्री करत आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर युद्ध, तेलाचे दर आणि व्याज दर यावर अवलंबून असतील.