नारायणगाव - कुकडी प्रकल्पातून मागील महिनाभरापासून उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने प्रकल्पातील धरणांतील पाणीसाठा पातळी खालावली आहे. प्रकल्पात आजअखेर ११.०९ टीएमसी (४०.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आलेले आवर्तन १० एप्रिल रोजी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून २५० किलोमीटर लांबीच्या कुकडी डावा कालव्यात ५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुरु केले होते. हे आवर्तन १० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. सद्यःस्थितीत कुकडी डावा कालव्यात १४५० क्यूसेकने, डिंभे डावा कालव्यात ६७५ क्यूसेकने, उजव्या कालव्यात २२० क्यूसेकने, मीना शाखा कालव्यात २०० क्यूसेकने आवर्तन सुरू आहे.
उन्हाळी आवर्तन सुरू होण्यापूर्वी प्रकल्पातील धरणात १७.९९५ टीएमसी (६०.६४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, मागील एक महिन्यापासून विविध कालव्यात आवर्तन सुरू असल्याने व बाष्पीभवनाचा दर वाढल्याने कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे.
कुकडी प्रकल्प आठमाही आहे. मात्र, दिवसेंदिवस सात तालुक्यांतील बागायती क्षेत्रात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा होऊनसुद्धा उन्हाळी हंगामात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळी हंगाम सुरू होण्यास अजून किमान तीन महिन्यांचा कालावधी असल्याने व धरणातील शिल्लक असलेला पाणीसाठा विचारात घेता शेतकऱ्यांमधून व धरण परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
कुकडी प्रकल्प दृष्टिक्षेपात
जुन्नर तालुक्यातील येडगाव, वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगे व आंबेगाव तालुक्यातील डिंभे या प्रमुख धरणांचा समावेश.
सुमारे २९.५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठवण क्षमता.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांना वरदान.
प्रकल्पातील दोन वर्षांतील पाणीसाठा
मागील वर्षी आजअखेर उपयुक्त पाणीसाठा - ७.२७ टीएमसी (२४.५० टक्के)
या वर्षी आजअखेर उपयुक्त पाणीसाठा - ११.०९ टीएमसी (४०.१२ टक्के)
मागील वर्षी ऑक्टोबरअखेर धरणांत उपयुक्त पाणीसाठा - ८७ टक्के
या वर्षी ऑक्टोबरअखेर धरणांत उपयुक्त पाणीसाठा - ९७ टक्के
धरणनिहाय आजअखेरचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीत) व कंसात टक्केवारी
येडगाव - ०.८८१ (४५.३७)
माणिकडोह - २.८४० (२७.९०)
वडज - ०.७०० (५९.६७)
पिंपळगाव जोगे - १.७२३ (४४.३१)
डिंभे - ५.७६० (४६.११)
या कार्यालयांतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर या तालुक्यांचा समावेश होतो. मार्चअखेर साडेआठ कोटी रुपये पाणीपट्टी वसूल करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, आजअखेर जेमतेम साडेचार कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. मागील १७ कोटी रुपयांची पाणीपट्टी शेतकऱ्यांकडे थकीत आहे. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.
- गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १