बांगलादेशमध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत उलटली, 23 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता
विशाल देवकर March 26, 2026 01:13 PM
Bangladesh Bus Accident: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यात एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. यात प्रवासी बस पद्मा नदीत कोसळल्याने आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून, काही जण अद्याप बेपत्ता आहेत. राजबारीहून ढाकाकडे जाणाऱ्या या बसमध्ये (Bus Accident) अंदाजे 40 प्रवासी होते. हा अपघात बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दौलतदिया फेरी टर्मिनल क्रमांक 3 समोर घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, बस फेरीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती पाण्यात कोसळली. ढाकाकडे जाणारी बस फेरीमध्ये चढत असताना एका युटिलिटी फेरीने तिला धडक दिली. या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत कोसळली, अशी माहिती आहे. (Bangladesh Bus Accident)

Bangladesh Police :  बांगलादेश पोलिसांनी काय सांगितले?

या घटनेबद्दल माहिती देताना, पोलीस निरीक्षक रसेल मोल्लाह म्हणाले, "आम्ही आतापर्यंत 23 मृतदेह बाहेर काढले आहेत. काही लोक अजूनही बेपत्ता असू शकतात आणि काही जण वाचले असावेत. रात्र झाल्यामुळे बचावकार्य तात्पुरते थांबवण्यात आले. परंतु अग्निशमन दल, नौदल, पोलीस आणि इतर दलांसह विविध दलांचे संयुक्त बचावकार्य सुरू आहे. रात्री अंधारामुळे बचावकार्य तात्पुरते थांबवण्यात आले आहे, परंतु दिवसा ते पुन्हा सुरू होईल." अशी माहिती पोलिसांनी दिली.

Bangladesh Bus Accident : अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता

सुमारे सहा तासांनंतर, 'हमजा' या बचाव जहाजाने पाण्यात बुडालेली बस बाहेर काढली. रात्री 11:15 वाजता बसचा काही भाग दिसू लागला आणि रात्री 11.30 वाजता क्रेनच्या मदतीने संपूर्ण बस बाहेर काढण्यात आली. अपघातातून बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, तो पोहून किनाऱ्यावर पोहोचला, पण त्याची पत्नी आणि मुलगा त्याच्या डोळ्यांदेखत बुडून मरण पावले. कालुखाली उप-जिल्ह्यातील अब्दुल अझीझुल यांनीही सांगितले की ते बसमध्ये होते आणि पोहून सुरक्षित ठिकाणी पोहोचले, परंतु त्यांची पत्नी आणि मुलगा अजूनही बेपत्ता आहेत.

Bangladesh Bus Accident News : डायव्हर्सना करण्यात आलं पाचारण

फेरी टर्मिनलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी बस पडली त्या ठिकाणी नदीची खोली अंदाजे 30 फूट आहे. अग्निशमन दलाच्या डायव्हर्सनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि बस पूर्णपणे बुडाल्यानंतर काही तासांनी एक बचाव नौका घटनास्थळी पोहोचली. राजबारी देवान येथील अग्निशमन अधिकारी सोहेल राणा यांनी सांगितले की, नदीच्या पलीकडील बाजूच्या इतर दोन टर्मिनल्सवरूनही डायव्हर्सना बोलावण्यात आले होते, तसेच ढाका येथूनही बचाव पथके पाठवण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.