अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयातच पोलीस शिपायाचं टोकाचं पाऊल; QRT च्या जवानाने स्वतःवर गोळी झाडली
प्रणय निर्बाण, एबीपी माझा March 26, 2026 03:13 PM

Amravati Crime News : अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात पोलीस आयुक्त कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून पोलीस शिपायाने आपली जीवन यात्रा संपवलीय. या आत्महत्या (Suicide) करण्यामागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या शीघ्रकृती दलाच्या (QRT) एका जवानाने (QRT Jawan) स्वतःवर गोळी झाडून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. (QRT Jawan Commits  )

Amravati Crime : अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयातच पोलीस शिपायाचं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, विजय नागापुरे असे मृत जवानाचे नाव असून या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आज (गुरुवारी) सकाळी 10 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. विजय नागापुरे यांनी हे टोकाचं पाऊल नेमकं का आणि कुठल्या कारणांनी उचललं हे पोलीस तपासाअंती समजू शकणार आहे.

Bhandara Crime : भंडाऱ्याच्या शिवनाळा वाळू घाटावर निघाला देशी कट्टा, घटनेनंतर पवनी पोलिसांनी केली देशी कट्ट्यासह आरोपीला अटक

वाळू घाटावरून निघणाऱ्या ट्रॅक्टर आणि भरधाव टिप्परमुळे गावातील रस्ते धुळेमय झाले असून ग्रामस्थांना या धुळीचा त्रास होतोय. त्यामुळे या रस्त्यांवर पाणी मारावे अशी मागणी करणाऱ्या ग्रामस्थांवरच वाळूघाटाच्या चौकीदारानं देशी कट्ट्याच्या दस्त्यानं डोक्याच्या मागील भागात जबर मारहाण केली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनीही चौकीदाराला मारहाण केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील शिवनाळा वाळू घाटावर काल सायंकाळी घडली. पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी कट्टा बाळगणाऱ्या चौकीदाराला अटक करण्यात आली आहे. शैलेश इटनकर (२८) असं जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे. तर, नूरबेग अब्बास बेग असं पोलिसांनी अटक केलेल्या चौकीदाराचं नावं आहे. हरित लवादाच्या बंदी नंतर दोन दिवसांपूर्वीच भंडारा जिल्ह्यातील सर्व वाळू घाट सुरू झाले असून अशी घटना घडल्याने आता प्रचंड खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात वाळू वाहतुकीवरून घडलेल्या घटनेत एकाची हत्या झाली होती, त्यामुळे भंडारा महसूल आणि पोलीस प्रशासनान आता इथं खबरदारी घेण्याची गरज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.