माझ्याविरोधात अघोरी पूजा… ठाकरेंच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; जादू करणाऱ्याचाच थेट मृत्यू!
Tv9 Marathi March 26, 2026 08:45 PM

Chandrakant Khaire : भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या भोंदूबाबाने आतापर्यंत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याची अनेक राजकीय नेत्यांसोबत जवळीक असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी तर त्याच्यासोबत फोटो असलेल्या मंत्र्यांची, नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हे अशोक खरात प्रकरण चांगलेच गाजले. काहीही झालं तरी अशोक खरातवर दया केली जाणार नाही, या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या खरातचे तंत्र-मंत्र, त्यांची कथित जादू याची चर्चा चालू असतानाच आता ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. माझ्यावरही एका व्यक्तीने अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न केला होता, असे खैरे म्हणाले आहेत.

चंद्रकांत खैरे यांनी नेमका काय दावा केला?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्षवर्धन सपकाळ यांनी अशोक खरातबाबत काही आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद घालवण्यासाठी त्यांच्याच मित्रपक्षातील काही सहकाऱ्यांनी खरातकडून तंत्र-मंत्र व अघोरी पूजा केली होती, असा दावा सपकाळ यांनी केलेला आहे. याच दाव्यावर बोलताना माझ्याविरोधातही अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाला, असं खैरे म्हणाले आहेत. “माझ्यावर सुद्धा अघोरी पूजा झाली होती. पण मी इतका धार्मिक आहे, देवभक्त आहे की माझ्यावर अघोरी पूजा करणारा माणूसच मरून गेला. मी मेलो नाही, तोच माणूस मेला,,” असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला.

माझ्यावर जादू करणारा माणूस स्वत:च मेला

राजकीय लोक बाबा लोकांकडे जातात. त्यांनी जाऊ नये. साधुसंतांच्या, देवांच्या दारी जाऊन प्रार्थना करावी. बाकीच्या लोकांच्या दारी कधी जाऊ नये. माझा जादूटोण्याववर अजिबात विश्वास नाही. मी इतका मजबूत आहे की माझ्या पाठीशी देवाची शक्ती आहे. मी अध्यात्मवादी आहे, धार्मिक वृत्तीचा आहे. म्हणून माझ्यावर जादूचे कोणतेही प्रयोग होत नाहीत. माझ्यावर जादूचा प्रयोग करणारा माणूस स्वतःच मेला. कन्नड तालुक्यातील नाचणवेलचा हा माणूस होता, अशी माहितीही खैरे यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.