मुंबई : इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठे चढउतार सुरू असून त्याचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. गुरुवारी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली.
गुरुवारी सोन्याचा दर 1,43,000 रुपयांवर आला असून तो बुधवारच्या तुलनेत सुमारे 2 हजार रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा दर 2,30,000 रुपयांवर पोहोचला असून त्यात तब्बल 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे दर जीएसटी वगळून असल्याची माहिती बाजारातून मिळाली आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे सोनं-चांदीच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाच दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केल्याने काही काळ परिस्थिती सुधारण्याची चिन्हं दिसत होती. मात्र इराणने ट्रम्प यांचं वक्तव्य फेटाळल्यामुळे पुन्हा एकदा बाजारात अनिश्चितता वाढली आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील शाब्दिक चकमकीमुळे गुंतवणूकदार संभ्रमात असून त्याचा परिणाम थेट सोनं आणि चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. जागतिक स्तरावर मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाल्याने दरात मोठे चढउतार होत आहेत.
सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, जर युद्धविराम पूर्णपणे लागू झाला तर सोन्याचे दर पुन्हा स्थिर होऊ शकतात. मात्र संघर्ष पुन्हा वाढला, तर सोनं आणि चांदी आणखी स्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.
ही बातमी वाचा: