डॉ. मालविका तांबे
सध्या क्लिनिकमध्ये छातीमध्ये दुखतंय, बरगड्यांच्या बाजूला वेदना जाणवतायत, जरा खाण्यात काही चुकलं की छातीमध्ये कळा जाणवतायत अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे.
हृदय हे शरीरातले अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. हृदय संपूर्ण शरीराला रक्त व प्राणवायूचा पुरवठा करत असतो. हृदयात काही बिघाड झाला तर त्याच्यामुळे बरेच वेगवेगळे त्रास होताना दिसू शकतात. एवढेच नव्हे तर हृदयाला स्वतःला रक्तपुरवठा योग्य झाला नाही तरी हृदयाचेही काम व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे हृदयाच्या ठिकाणी काहीही त्रास वाटला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. छातीत दुखलं म्हणजे प्रत्येक वेळेला हृदयातच काहीतरी झालेलं आहे असं नसतं. परंतु हृदयात जर का सुई टोचल्यासारखा अनुभव येत असला, हृदयाच्या ठिकाणी थोडा जडपणा वाटत असला, दुखत असलं आणि मुख्य म्हणजे श्वास कोंडतोय किंवा श्वास लागतोय अशी परिस्थिती होत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये व लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हृदयाचे कार्य
हृदय फुफ्फुसांकडून शुद्ध रक्त घेऊन संपूर्ण शरीराला पुरवण्याचे काम करतं. पण त्याच बरोबरीने हृदय हे चेतनेचे, प्राणाचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनाचेही स्थान असते. कोणावरती प्रेम जडलं की ते आपसूक हृदयाशी जोडले जाते. कुठल्याही प्रकारचं दुःख झालं, अपघात झाला, ताणतणाव आला की हृदयाची गती सर्वप्रथम वाढते किंवा त्या ठिकाणी जडपणा जाणवायला लागतो. तसेच काही अनामिक भीती वाटल्यास हृदयाच्या ठिकाणी थंडपणा सुद्धा जाणवतो. म्हणजेच हृदयाचे कार्य फक्त शारीरिक स्तरावरती सीमित नसून मानसिक व आध्यात्मिक स्तरावरती सुद्धा असतात.
हृदयरोगाची कारणे (आयुर्वेदामध्ये हृदयरोगाची कारणं पुढीलप्रमाणे सांगितली आहेत)
• अति उष्ण, पचण्याकरता जड अन्न घेणे
• फार जास्त प्रमाणात तुरट आणि कडू चवीचे आहार घेणे
• अतिप्रमाणात श्रम करणे
• जास्त भोजन करणे
• कुठल्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक आघात होणे
• अतिप्रमाणात मैथुन करणे
• अतिप्रमाणात चिंता करणे किंवा होणे
• मलमूत्रादी वेगांचं धारण करणे
या सगळ्यामुळे हृदयरोग होण्याची संभावना फार प्रमाणात वाढते.
सध्याच्या काळात बाहेरचे अन्नपदार्थ फार प्रमाणात खाल्ले जातात. ते अर्थातच फार तिखट असतात, उष्ण असतात, पचायलासुद्धा जड असतात. वजन कमी ठेवण्याच्या दृष्टीने सध्या तुरट व कडू चवीचं भोजन जास्त प्रमाणात केलं जातं. तसेच अतिप्रमाणात व्यायाम सुद्धा जिम करणं, फार चालणं हे ही पाहायला मिळतंय. रुक्ष वस्तूंचं सुद्धा सेवन अतिप्रमाणात करताना लोक दिसतायत. भूक लागली असली तरी खाणं पिणं टाळलं जातं. इंटरनेटमुळे अगदी लहान वयापासूनच मानसिक व शारीरिक उत्तेजना होईल अशा प्रकारचे व्हिडीओ फार प्रमाणात उपलब्ध आहेत. जीवनशैली अनियमित असल्यामुळे व त्यामध्ये ताणतणाव भरपूर असल्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.
ही तणावपूर्ण जीवनशैली बऱ्याचदा नवीन पिढीला चुकीच्या मार्गावरती जाण्यास सुद्धा प्रवृत्त करते. रिलॅक्स होण्याकरता बऱ्याच प्रमाणात मद्यपान घेणे, सिगरेट ओढणे, चुकीचे अमली पदार्थ घेणे हे बऱ्याच प्रमाणात सध्या दिसायला लागलेले आहे. कुठल्याही प्रकारचे व्यसन असल्यास सुद्धा हृदयरोग होण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तसेच या जीवनशैलीमुळे वजन वाढणे, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड इत्यादीसारखे आजार होण्याने सुद्धा हृदयरोग होण्याची शक्यता फार प्रमाणात वाढताना दिसते. अनुवांशिकता हृदयरोगामध्ये खूप महत्त्वाची असते. आयुर्वेदाप्रमाणे हृदय हा मातृज अवयव असतो म्हणजे हृदयावरती आईच्या प्रकृतीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो. तसेच गर्भधारणेपूर्वी आई व वडिलांचे आहार व आचरणाचे चुकीचे दुष्परिणाम सुद्धा हृदयरोगाचे कारण बनू शकतात.
टाळूया हृदयरोग
हृदयरोग होऊ नये किंवा झाल्यास तो बरा व्हावा आणि पुन्हा पुन्हा त्याचा त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टीचं पालन करता येऊ शकतं.
१ नेहमी प्रकृतीला अनुरूप असेल व पचण्यास हलका असेल असा आहार घेणे जास्त उत्तम ठरते. आहार खाल्ल्यावरती त्याचे नीट पचन होणे अत्यंत आवश्यक असतं. पचन न होत असल्यास आहारामध्ये आलं, सुंठ, मिरी, हिंग, जिरं इत्यादी पचनाला मदत करण्याच्या द्रव्यांचा समावेश नक्की असावा. जेवल्यानंतर संतुलन अन्नयोग सारख्या गोळ्या घेतल्याने पचन सुधारायला मदत मिळते.
२ आहारामध्ये रोज पाच ते सात चमचे साजूक तूप सुद्धा असलेलं अत्यंत उत्तम. हे साजूक तूप गायीच्या दुधापासून बनवलेलं असावं व बनवताना आयुर्वेदिक शास्त्रोक्त पद्धत पाळलेली जास्त उत्तम ठरते. तसेच गायीचे शुद्ध दूध सुद्धा किमान अर्धा कप ते एक कप तरी रोज घेतलेले चांगले ठरते. आहारामध्ये मध, खडीसाखर, मनुका, अमृत शर्करा युक्त सुवर्ण असलेला पंचामृत, चांगल्या प्रतीचे तांदूळ, साळीच्या लाळ्या, जव, मूग, करवंद, कारले, दुधी, भोपळा, कोहळा, डाळिंब, सफरचंद, केसर, बदाम, खारीक इत्यादी सारख्या हृदयाला पोषक गोष्टी आहारात नक्की ठेवावा. फार जास्त प्रमाणात तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ उदाहरणार्थ दही, ताक, फार पचायला जड अन्न, तुरट पदार्थ, हृदयरोगामध्ये वर्ज्य ठेवावे.
३ आठवड्यातून एक दिवस तरी उपवास करावा. उपवास करणं शक्य नसल्यास नुसते लंघनकरावे. उदाहरणार्थ एखाद्या रात्री फक्त गरम पाणी पिऊन झोपलेलं जास्त उत्तम. तसं करणं शक्य नसल्यास नुसते शहाळ्याचे पाणी किंवा एखादे सरबत किंवा पातळ मुगाची खिचडी, मुगाचे सूप अशा प्रकारचा आहार घेतलेला जास्त बरा. याच्याने पोटाला विश्रांती मिळते व पचन व्यवस्थित राहायला मदत मिळते.
४ संपूर्ण अंगाला नियमित अभ्यंग केल्याने शरीरातलं रक्ताभिसरण व्यवस्थित राहायला मदत मिळते. संपूर्ण अंगाला रोज तेल लावणं शक्य नसल्यास किमान छातीला तरी तेल लावून नक्की झोपावं व तसेच पोटाला सुद्धा हलक्या हाताने गोल फिरवून तेल जिरवावे.
५ रोज नियमित तीस ते चाळीस मिनिटे चालायला जाणं, प्रकृतीनुरूप योगासनं करणं. दहा ते पंधरा मिनिटं अनुलोम विलोम करणं. ओमकार गुंजन करणं आपल्या दिनचर्येत नक्की ठेवावे. या सगळ्याने हृदयाला प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित व्हायला मदत मिळते.
६ रोज चांगले स्वास्थ्य संगीत ऐकणे, मनाला विरंगुळा ठेवण्याकरता एखादा छंद जोपासणे मदत करू शकते.
७ औषध वनस्पतींमध्ये अर्जुन, मनुका, पुनर्नवा, कमळ, सुवर्ण, हिरक, श्रृंग इत्यादी आयुर्वेदामध्ये हृदय सांगितलेले आहेत. अर्थात हृदयाची ताकद वाढण्यास मदत करू शकतात. वैद्यांकडून या द्रव्यांपैकी कुठले तरी औषध नक्की सुरू करावं. सुहृद प्राश सारखी च्यवनप्राश नियमित घेणे उत्तम ठरू शकेल.
८ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने शरीरशुद्धी अर्थात पंचकर्म करून घेलेलं उत्तम राहील. याच्यामध्ये हृदबस्ती घेतल्याचा उत्तमोत्तम फायदा होताना दिसतो. हृदयरोगामध्ये बऱ्याचदा शस्त्रकर्म सोडून दुसरा काही पर्याय नाही असेही सांगितलेले रोगी कारल्यामध्ये शास्त्रोक्त पंचकर्म केल्यानंतर गेले वीस पंचवीस वर्ष सामान्य आयुष्य जगत आहेत.
आयुर्वेदामध्ये हृदयाला ‘सद्य प्राणहर मर्म’ अर्थात कुठल्याही प्रकारची इजा झाली किंवा अपघात झाला तर लगेचच मृत्यू होते. म्हटलं आहे त्यामुळे त्याची काळजीची सुरुवात आयुर्वेदात गर्भावस्थेपासूनच होते. ज्यांच्या घराण्यात हृदयरोगाचा इतिहास असेल त्यांनी तर गर्भ राहण्यापूर्वीच शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे व गर्भावस्थेत सुद्धा हृदयाला पोषक अशा औषध उपचारांचा वापर केला पाहिजे. एकूणच हृदयरोग होऊ नये असे वाटत असणाऱ्यांनी आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे उत्तम ठरेल.