ढिंग टांग : अंधश्रद्धा : शाप की वरदान..?
esakal March 27, 2026 09:45 AM

आजची तिथी : पराभव संवत्सर श्रीशके १९४८ चैत्र शु. अष्टमी (श्रीराम नवमी)

आजचा वार : नमोवार...आय मीन गुरुवार!

आजचा सुविचार : नाही निर्मळ जीवन । तेथे काय करील साबण..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फार पुसट सीमारेषा असते. पावणेतीन पावरचा चष्मा लावल्याबिगर ती दिसत नाही. दुर्दैवाने श्रद्धेच्या नावाखाली आजकाल अंधश्रद्धेचा बाजार मांडला गेला आहे. केवड्याच्या जुडीत बोंबलाची काडी आली तर एकवेळ समजू शकते. पण आजकाल बोंबलाच्या जुडीत केवड्याचे पान शोधावे लागते. हेच ते कलियुग!

नाशिकच्या भोंदू खराताने महाराष्ट्राचे निर्मळ जीवन गढूळ करून टाकले आहे. परवाच्या दिवशी आमचे गिरीशभाऊ महाजन नाशकाहून आले. चेहरा पडलेला होता. मी विचारलं की काय हो, काय झालं? तर म्हणाले, ‘‘काय सांगू? ‘सातच्या आत घरात’ असं सांगायची सोय नाही राहिली. ‘सातच्या आत खरात’ असंच ऐकू यायला लागलंय! जिथं पवित्र कुंभमेळा घ्यायचा, तिथं हा कसला अंधश्रद्धेचा विकृत खेळ सुरू झाला? माझं मन रडतंय!’

मी त्यांचे सांत्वन केले. किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रालाच थोडेसे समजावून सांगायची वेळ आली आहे, हे तेव्हा माझ्या लक्षात आले. तदनुसार श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक मी परवा सभागृहात समजावून सांगितला. खूप वर्षांपूर्वी शाखेत यावर बौद्धिक ऐकले होते. ते उपयोगी पडले. माझे व्याख्यान अप्रतिम रंगल्याचे नंतर एका आमदाराने सांगितले. ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’, ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ ही मी लिहिलेली पुस्तके (खरेच) खूप गाजली. तशाच धर्तीचे ‘अंधश्रद्धा : शाप की वरदान’ हे पुस्तक मी लिहायचे म्हणतो आहे. सध्याच्या काळात बरेच खपेल!!

माझा जादूटोण्यावर विश्वास नाही. पण कुणी आपापल्या आवडीच्या बुवाकडे जात असेल तर आपण त्याच्या आड येत नाही. व्हिडिओ बाहेर आले की आपोआप त्या बुवाचा बाजार उठतो. आपण कशाला काही करावे? जादूटोणा हा समाजाला लागलेला शाप आहे. विवेक (साप्ताहिक नव्हे!) हा त्यावर उःशाप आहे. जादूटोण्याने गोष्टी घडत असत्या तर डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून भोंदू खरातलाच पाठवला असता! युद्ध लढण्याऐवजी दोनचार बंगाली बाबा सरहद्दीवर पाठवून भानामतीने शत्रूची मती गुंग केली असती. इतकेच काय, लिंबू मिरच्या लावून निवडणुकाही जिंकलो असतो.

तथापि, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणखी कडक करण्याचा विचार मी करतो आहे. रेड्याची शिंगे, वाघाचे कातडे, वटवाघळाचे पंख, उदमांजराचे दात, मुंगसाची शेपटी आदी जादूटोण्यातील अनिवार्य वस्तूंवर सरसकट बंदी आणण्याचा माझा विचार आहे. यात मानवी कवटीचा समावेशही करावा लागेल असे वाटते!!

अवघा अंधश्रद्ध मेळवावा, भोंदुधर्म वाढवावा, हे आजच्या युगाचे ब्रीदवाक्य बनले आहे, हे दुर्दैव. भोंदुधर्म नव्हे, महाराष्ट्रधर्म वाढला पाहिजे. हे पुरोगाम्यांचे राज्य आहे. भाषणानंतर मला अनेक आमदार भेटले. म्हणाले, ‘‘साहेब, तुम्ही आमचे डोळे उघडले. आता अडीअडचणीला तुमच्याकडेच येत जाऊ!’’

‘श्रद्धा म्हणजे काय, देवाभाऊ?,’ आमच्याच पक्षाच्या एका भाविक आमदाराने हात जोडून विचारले.

‘‘जी आपली मोदीजींवर आहे, ती श्रद्धा!,’ मी सोदाहरण व्याख्या सांगितली.

‘…आणि अंधश्रद्धा म्हंजे?,’ भा. आ.

‘आपल्या महायुतीच्या एकजुटीबद्दल खात्री आहे, ती अंधश्रद्धा!,’ मी डोळे मिचकावत अंधश्रद्धेची सोदाहरण व्याख्या सांगितली. भा. आ. ला पटले असावे, कारण त्याने कानाच्या पाळ्या पकडून पुन्हा हात जोडले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.