ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी की ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं माती करून घेतलं. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीतवर येऊन पडली.
लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसा हातात खेळत नसला तरीसद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.
दुसरीकडे आहे एक घरंदाज कुटुंब, ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम. या कुटुंबात तीन मुलं स्वराज, दीप, विराज आणि त्यांच्यासोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचा आहे.
विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीपचा त्याच्या वडिलांवर जास्त राग आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्याने आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपच जबाबदार आहे अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला आहे.
गोष्ट सुरु होते त्याच एका धक्कादायक घटनेनं, जिथे एक मृत्यू होतो. एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण लागतं. मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.