तात्या लांडगे
सोलापूर : नागरिकांना परवडेल अशा दरात प्रवास करता यावा, या उद्देशाने सोलापूर महापालिकेला केंद्र सरकारच्या योजनेतील १०० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यासाठी बुधवार पेठेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्यात कंपनीकडून महापालिकेला पहिल्या टप्प्यातील ३० बस मिळणार आहेत.
केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई-बस सेवा’ योजनेतून सोलापूर महापालिकेला १०० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यातील १० बस महिलांसाठी (पिंक बस) स्वतंत्र असणार आहेत. बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनवर एकाचवेळी २० बस चार्जिंग करता येतील. बसगाड्या त्याठिकाणी लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी खोल्या बांधल्या जात आहेत.
आता ३१ मार्चपर्यंत राज्य शासनाचा कंपनीसोबत करार होणार असून त्यानंतर कंपनीसोबत महापालिकेचा करार होणार आहे. त्यानंतर महापालिकेला पहिल्या टप्प्यातील बस मिळणार असून त्यासाठी मे उजाडणार आहे. बस मिळाल्यावर प्रवाशांना स्वस्तात आरामदायी प्रवास करता येणार आहे.
बसचे मार्ग निश्चित, ९५ टक्के काम पूर्ण
राज्य शासनाचा कंपनीसोबत करार झाल्यावर महापालिका त्या कंपनीसाेबत करार करेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ३० इलेक्ट्रिक बस सोलापूर महापालिकेला मिळणार आहेत. बस कोणत्या मार्गांवर धावणार हे निश्चित केले आहे. चार्जिंग स्टेशनचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम काही दिवसांत पूर्ण होईल.
- तपन डंके, अधिकारी, सोलापूर महापालिका
चालक कंपनीचे अन् वाहक महापालिकेचे
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात आता केंद्र सरकारच्या योजनेतील १०० इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० बस येतील. खासगी कंपनीमार्फत त्या बस चालवल्या जाणार आहेत. त्या बसगाड्यांचे चालक कंपनीचे असतील, पण वाहक (कंडक्टर) महापालिकेचे असणार आहेत. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर या बस धावणार असून रिक्षापेक्षा बसचे तिकीट कमी असणार आहे.