Pune News : भुयारी मेट्रोच्या सुरक्षेसाठी पुणे महापालिकेची नवी नियमावली
esakal March 28, 2026 03:45 AM

पुणे - कुपनलिकेचे काम करताना थेट मेट्रोच्या भुयारी मार्गाला छिद्र पडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. त्याची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्तांकडून आता भुयारी मेट्रोच्या मार्गाच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी नवीन नियमावली केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या इमारती आणि वाड्यांच्या पुनर्विकासाचे काम व कूपनलिकेच्या कामासाठी महापालिकेची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शुक्रवार पेठेतील खडक पोलिस ठाण्यासमोरील एका वाड्यामध्ये कूपनलिकेचे काम सुरू होते. खोदकाम करताना भुयारी मेट्रो मार्गास छिद्र पडले. त्यामुळे स्वारगेट-पिंपरी-चिंचवड या मेट्रोच्या भुयारी मार्गातून पाणी गळती सुरू झाली. या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने घरमालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ या घटनेची महापालिकेनेही गांभीर्याने दखल घेतली.

मेट्रो मार्गाच्या आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे मेट्रोच्या सेवेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी बांधकाम परवानगी देताना विशेष काळजी घेण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. भुयारी मेट्रो मार्ग जात असलेल्या भागांत बांधकाम करताना वेगळ्या तांत्रिक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.

आयुक्त राम म्हणाले, ‘‘जुने वाडे, इमारतींचा पुनर्विकास करताना भुयारी मेट्रो मार्गाला फटका बसू शकतो, हे निदर्शनास आले. त्यामुळे भुयारी मेट्रो मार्गांवरील जुन्या इमारती, वाडे यांचा पुनर्विकास करताना, नवीन बांधकामे करताना कडक नियम तयार केले जाणार आहेत. कूपनलिका खोदकामासाठी भूजल विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक करण्यात येईल. आतापर्यंत बांधकाम परवानगी घेताना अनेक ठेकेदार एकाच परवानगीच्या आधारे कूपनलिकेचेही खोदकाम करत होते. यापुढे प्रत्येक प्रक्रियेसाठी स्वतंत्र मंजुरी आवश्यक असेल.’’

भुयारी मार्गातून धावणाऱ्या मेट्रोतून हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, एखाद्या घटनेमुळे मेट्रो सेवेला फटका बसू शकतो. कूपनलिकेच्या घटनेवरून हा प्रकार अधिक गंभीर असल्याचे लक्षात आले. त्यामुळेच भुयारी मेट्रोच्या मार्गावर पुनर्विकासाची कामे करण्यासाठी स्वतंत्र नियमावली केली जाईल.

- नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.