Aaditya Thackeray : अशोक खरात फाइल्स हा सगळा गलिच्छ प्रकार आहे. किळसवाना प्रकार आहे. जे काही ऐकतोय ते भयानक असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात विचारले असता, ठाकरे म्हणाले की, मी व्हिडिओ पाहिलेला नाही आणि पाहायची इच्छा देखील नाही. हे प्रकरण तर आहेच पण त्यांच्या पीएलाही लाच घेताना अटक करण्यात आली होती. साताऱ्यात काय झालं ते आपण बघितलेलं आहे. कोण मुख्यमंत्र्यावर टीका करणारा मंत्री आहे, कोण मार खाणारा मंत्री आहे, असा सगळा कारभार घेऊन मुख्यमंत्री कुठपर्यंत काम करणार आहेत. ही वेगवेगळी प्रकरण समोर येत आहेत, हे मुख्यमंत्र्यांना पटतंय का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. या सगळ्यात प्रकरणात असणारी लोकं मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीची आहेत का? हे मुख्यमंत्र्यांनी बघावं असे ठाकरे म्हणाले.
80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख आहे. भूमिपुत्र स्थानिकांना रोजगार देण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी शिवसेना सदैव कार्यरत असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. यासाठीच रोजगार मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. अशा अनेक रोजगार मेळाव्यांचे आयोजन महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत असे ठाकरे म्हणाले.
ऑपरेशन टायगरबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांचे खासदारही त्यांच्या संपर्कात असतील, 33 देशातले खासदार त्यांच्या संपर्कात असतील, त्यामुळं त्याची जगभर चर्चा असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाला लगावला. मातोश्री झालेल्या खासदारांच्या बैठकीबाबत देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. बातमी तुम्हीच लावणार आणि उत्तरही आमच्याकडून मागणार असे ठाकरे म्हणाले. चुकीच्या बातम्या काही लोक पेरत आहेत. आम्ही या सगळ्याला काडीमात्र किंमत देत नाही असे ठाकरे म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून राज्यात विविध मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये अशोक खऱात प्रकरण समोर आल्यानं राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. खरातबरोबर अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. या प्रकरणामुळं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्याचबरोबर मंत्री नरहरी झिरवाळ यांचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन जरदार टीका होत आहे.