वाल्हे - वागदरवाडी (ता. पुरंदर) येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धेश सुनील पवार (वय २१) याची पोलिसपदी निवड झाली आहे. अपार कष्ट, सुविधांचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थितींवर जिद्दीने मात करत सिद्धेशने पुणे ग्रामीण पोलिस दलात खुल्या प्रवर्गातून निवड मिळवत संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.
सिद्धेशने कोणताही खासगी क्लास न घेता, शाहू फुले-आंबेडकर अभ्यासिकेमध्ये सातत्यपूर्ण अभ्यास करून लेखी आणि मैदानी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली. लेखी परीक्षेत १०० पैकी ९३ गुण आणि मैदानी परीक्षेत ५० पैकी ४१ गुण मिळवून त्यांनी एकूण १३४ गुण मिळवले.
घरची परिस्थिती जेमतेम असून वडील ट्रान्सपोर्ट व्यवसाय तर आई शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय करते. सिद्धेशने केलेल्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच त्याची पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये निवड झाली. यासाठी त्याची आई वर्षा व वडील सुनील पवार यांसह येथील श्रीनाथ सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष अंकुश पवार यांसह कुटुंबीयांनी मोलाची मदत केली.
सिद्धेशचे प्राथमिक शिक्षण वागदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यानंतर पाचगणी येथे पाचवी ते दहावी व अकरावी, बारावी सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात पूर्ण केले. परिस्थितीवर जिद्दीने मात करत सिद्धेशने हे यश मिळविले आहे.