डॉ. मनिषा माधव पोतदार - saptrang@esakal.com
डॉ. पूजा पराग सामंत यांचा संशोधनात्मक प्रबंध ‘द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङ्मय’ हा ग्रंथरूपाने प्रकाशित होणं ही आनंददायी व समाधानकारक बाब आहे. डॉ. पूजा सामंत हिने एका उपेक्षित शाहिरावर संशोधनात्मक प्रबंध लिहिला, याचा मला खूप आनंद वाटतो. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील इत्यादी अनेक शाहिरांचे लेखन, साहित्य उपलब्ध आहे; पण शाहीर गव्हाणकरांविषयी जेवढे साहित्य प्रकाशित व्हायला हवे होते, तेवढे झालेले नाही. ते काहीसे दुर्लक्षित राहिले. हवी तेवढी प्रसिद्धी शाहीर गव्हाणकरांच्या वाट्यास आली नाही. मात्र, आता डॉ. पूजा यांच्या या संशोधनात्मक ग्रंथामुळे शाहिरी वाङ्मयात मोलाची भर पडली आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तिसंग्राम, लालबावटा कलापथक अशा अनेक गोष्टींचा उल्लेख होतो, त्या वेळी शाहीर अमरशेख, द. ना. गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील अशा अनेक शाहिरांनी महाराष्ट्राला प्रेरणा दिली हेही लक्षात येतं. शाहीर द.ना. गव्हाणकर यांनी आयुष्यातील ४० वर्षे शाहिरीला दिली; पण शाहीर गव्हाणकर उपेक्षित राहिले. याची जाणीव झाल्यामुळे लेखिकेने हा विषय निवडला, हीच कौतुकाची गोष्ट आहे. संपूर्ण ग्रंथ वाचताना लेखिकेने घेतलेले कष्ट, बारकाईने केलेला अभ्यास हे सर्व जाणवते.
सन १९१५ ला महागोंड, ता. आजरा, जि. कोल्हापूर, येथे द.ना. गव्हाणकर यांचा जन्म झाला. शाहीर गव्हाणकर हे कलानगरामध्ये वाढले. त्यानंतर इंग्रजी विषय घेऊन पदवीधर झाले. राष्ट्रीय शाहीर नानिवडेकरांकडून शाहिरीचे धडे घेतले. ते गव्हाणकरांचे गुरू. लेखिकेने नानिवडेकर यांची माहिती उत्तमरीत्या मांडली आहे. शाहीर गव्हाणकरांच्या लेखनात गावाकडचे सर्व संस्कार आहेत. मातीचे संस्कार, वारकरी संस्कार त्यांच्या लिखाणात दिसतात. कम्युनिस्ट पक्षाने १९४४ मध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर द.ना. गव्हाणकर, शाहीर अमरशेख यांना एकत्र आणले आणि हे त्रिकूट सर्वत्र प्रसिद्ध झाले. या त्रिकुटानेच ‘लालबावटा कलापथक’ काढले.
शाहीर गव्हाणकर पदवीधर असून, त्यांनी नोकरी सोडून समाजासाठी, देशासाठी स्वतःला शाहिरीत झोकून दिले. त्यानंतर कामगार, शेतकरी, कष्टकरी यांच्याच विकासाचा, परिवर्तनाचा ध्यास त्यांना लागला. शाहीर गव्हाणकरांजवळ चित्रणाची उत्तम कला होती. रणजीत देसाई यांच्या पुस्तकातील शिवकालीन किल्ल्यांची छायाचित्रे त्यांनी टिपलेली आहेत, हे अनेकांना माहीत नसेल. चित्रपट क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले. शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीच्या मुखपृष्ठावरील ‘फकिरा’ हा गव्हाणकर यांनी काढला आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्याला मिळाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्तिसंग्राम हा काळ शाहिरांनी अगदी स्वतःची तमा न बाळगता गाजवला. प्रसंगी उद्भवलेल्या संघर्षालाही धैर्याने तोंड दिले. शाहीर गव्हाणकर हे लेखक, कवी, छायाचित्रकार, दिग्दर्शक, अभिनेता असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते आणि ते लेखिकेने अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे. महाराष्ट्र शाहिरी परिषदेची स्थापना करण्यामागे गव्हाणकर यांचे मोठे योगदान आहे. तसेच, मराठी शाहिरी फ्रान्सपर्यंत पोहोचवण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
‘महाराष्ट्रा वळुनी बघ जरा...’ हा गव्हाणकरांचा प्रभावशाली पोवाडा त्या काळात लोकांना लढण्याची शक्ती देत होता. आजही तो ऐकताना भारावून जायला होतं. गव्हाणकर यांची भाषा आत्मीयतेची होती. त्यामुळे लढ्यासाठी लोक पेटून उठत. गव्हाणकरांनी अनेक लोकनाट्ये लिहिली. मुंबईचा कामगार, बंड्या दिवाण, स्वर्गलोकीचा बातमीदार अशी अनेक लोकनाट्य सादरदेखील केली. जीवनातला संघर्ष त्यांच्या लोकनाट्यातून ठळकपणे दिसतो. लोकांना त्यांच्या लोकनाट्यांनी अगदी खडबडून जागे केले. त्यांनी तळागाळातील लोकांमध्ये जागृती घडवून आणली. कलापथकातून माणसे जागवली. त्यांचा परिवर्तनाचा विचार हळूहळू यशस्वी होत गेला. लोकभाषेतून शाहीर गव्हाणकर समाजाला जागृत करण्याचे काम अहोरात्र करत होते. या सर्व घटकांची ससंदर्भ मांडणी लेखिकेने या पुस्तकात केली आहे. त्यामुळे गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू व त्यांचे वाङ्मय समजण्यास मदत होते.
डॉ. पूजा सामंत यांची लेखनशैली ओघवती आहे. त्यामुळे एकदा ग्रंथ हातात घेतला की, तो खाली ठेवावासा वाटत नाही. उपेक्षित शाहिरावर व शाहिरी वाङ्मयावर त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण लिखाणाचा उपयोग संशोधक, वाचक व अभ्यासकांना वेळोवेळी होईलच.
पुस्तकाचे नाव : द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाङ्मय
लेखक : डॉ. पूजा पराग सामंत
प्रकाशक : ओशन वेव्हज पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे : २१२ मूल्य : २५० रु.