2 तास 9 मिनिटांचा जबरदस्त क्राइम थ्रिलर; नेटफ्लिक्सवर येताच नंबर 1 वर ट्रेंड होतोय चित्रपट
Tv9 Marathi March 29, 2026 03:45 PM

थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले बहुतांश चित्रपट नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतात. अनेकदा काही चित्रपटांना थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नाही, कमाईही जेमतेमच होते; परंतु त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर जबरदस्त प्रतिसाद मिळतो. असाच एक क्राइम थ्रिलर थिएट्रीकल रन पूर्ण झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला आहे. नेटफ्लिक्सवर येताच या चित्रपटाने टॉप ट्रेंडिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप 10 चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर असलेल्या या क्राइम थ्रिलरला आयएमडीबीवर 7.5 रेटिंग मिळाली आहे. 2 तास 9 मिनिटांचा हा चित्रपट पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

या चित्रपटाची कथा एका अशा महिला पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते, जिच्यावर लहान मुलांची तस्करी करणाऱ्या माफिया गँगला पकडण्याची मोहीम सोपवली जाते. अर्थात ही मोहीम सोपी नसते. कारण या गुन्ह्याची मुळे खूप खोलवर रुजलेली असतात. 93 मुलींच्या सामूहिक अपहरणाचा तपास करताना मोठा पर्दाफाश होतो. या क्राइम थ्रिलरचं नाव आहे ‘मर्दानी 3’. अभिराज मिनावाला दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्राने केली आहे. यामध्ये राणी मुखर्जीने मुख्य भूमिका साकारली असून तिच्यासोबत जानकी बोडीवाला आणि मल्लिका प्रसाद यांच्या भूमिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

राणीचा हा चित्रपट 30 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 27 मार्च रोजी तो नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला. ‘मर्दानी 3’च्या निमित्ताने शिवानी शिवाजी रॉय या पोलीस अधिकारीच्या भूमिकेत राणी मुखर्जी परतली आहे. देशातील बेपत्ता झालेल्या असंख्य मुलींना वाचवण्यासाठी तिने मोहीम हाती घेतली आहे. यावेळी शिवानीचा सामना एका निर्दयी, दुष्ट आणि क्रूर स्त्री ‘अम्मा’शी होतो. निष्पाप जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी या चित्रपटात शिवानी अत्यंत कठीण लढाई लढताना दिसते.

मर्दानी 3’चं लेखन ‘द रेल्वे मॅन’ फेम आयुष गुप्ता यांनी केलं असून त्यांचा हा चित्रपट जागतिक स्तरावर यशस्वी ठरला होता. ‘मर्दानी’ फ्रँचाइजीमधील पहिल्या चित्रपटात मानवी तस्करीचं भीषण वास्तव उघड करण्यात आलं होतं. तर ‘मर्दानी 2’मध्ये व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका सराईत बलात्काऱ्याच्या अस्वस्थ करणाऱ्या मानसिकतेचं चित्रण करण्यात आलं होतं. राणी मुखर्जी या तिन्ही चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.