गोळीबार, चकमक अन् मोठा कट उघड! आरोपीचे थेट लॉरेन्स बिश्नोई गँगशी कनेक्शन; रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणाशीही लिंक?
abp majha web team March 29, 2026 05:13 PM

Rohit Shetty: राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात घडलेल्या पोलिस आणि गुन्हेगारातील चकमकीमुळे मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चकमकीत जखमी झालेला आरोपी आकाश निगम याचे संबंध कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) असल्याचे समोर आले आहे.राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे शुक्रवारी रात्री साधुवाली चेक पोस्टवर झालेल्या पोलीस चकमकीत एका गुंडाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाशीही त्याचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2025 रोजी रात्री मुंबईत रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शूटर आरजू बिश्नोई याचा हात होता. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, आकाश निगम आणि त्याचा साथीदार शिवा गुर्जर यांनी या हल्ल्याची रेकी आणि नियोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आरजू बिश्नोईच्या सूचनेनुसार आकाश निगमला श्रीगंगानगर येथे दुसऱ्या गुन्हेगारी कृत्यासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री सादुलशहर परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असताना आकाश निगमच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न करत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण गँग नेटवर्कचा तपास सुरु 

बीकानेर रेंजचे आयजी ओमप्रकाश यांनी या घटनेविषयी सांगितले की, आकाश निगम हा लॉरेन्स गँगचा सक्रिय सदस्य असून राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांत गुन्हेगारी कारवायांमध्ये तो सहभागी होता. त्याचा सहकारी शिवा गुर्जर याला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिस सध्या संपूर्ण गँग नेटवर्कचा तपास करत असून, आकाश निगम बरा झाल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. या तपासातून रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणासह इतर अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.