पुणे : आपसांतील संबंधातून उद्भवलेल्या वादातून महिलेचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना कात्रजमधील भिलारवाडी परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मनीषा खम्म दमाई (वय २५, सध्या रा. आयुषी कॉम्प्लेक्स, नऱ्हे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय ३५, रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा आणि आरोपी प्रकाश हे दोघेही मूळचे नेपाळचे आहेत. प्रकाश हा पुण्यात रखवालदार म्हणून काम करीत होता. त्यांच्यात अंतर्गत वादातून वारंवार भांडण होत होते. प्रकाश हा १८ मार्च रोजी मनीषाला भेटण्यासाठी नऱ्हे परिसरात आला. त्याने तिला बोलण्यात गुंतवून नवीन कात्रज बोगद्याजवळ नेले. तेथील भिलारवाडी परिसरातील एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दाट झाडीत त्याने मनीषाचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.
दरम्यान, मनीषा बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी दिल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांना २८ मार्च रोजी कात्रज परिसरातील झाडीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी प्रकाशला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक फिरोज मुलानी करत आहेत.