पाषाण: पाषाण सर्कलपासून विविध सोसायट्यांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेचे कर्मचारी नियमित सफाई करत असले, तरी अज्ञात व्यक्ती कचरा टाकत असल्यामुळे या रस्त्याचे रूपांतर कचराकुंडीत झाले आहे. परिणामी येथील गुरू रामकृष्ण गृहनिर्माण संस्था व परिसरातील इतर सोसायट्यांच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या भागातील नागरिकांना पूर्वी लष्करी संस्थेच्या रस्त्याचा वापर करण्याची सुविधा होती. मात्र, सुरक्षिततेमुळे हा रस्ता बंद झाल्याने आता रहिवाशांना पाषाण सर्कलपासून गुरू रामकृष्ण गृहनिर्माण सोसायटीकडील अरुंद रस्त्याचा वापर करावा लागत आहे.
Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडामात्र येथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
काय आहेत समस्या...कचरा टाकणे आणि दुर्गंधी : रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.
कचरा जाळण्याचे प्रकार : साचलेला कचरा अनेकदा पेटवून दिला जातो. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास वाढत आहे.
वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण : या रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यातच भू-नोंदणी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बाणेर ते कोथरूडला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे.
"या समस्येची दखल घेणार असून लवकरच परिसराचे सर्वेक्षण केले जाईल. हा रस्ता ‘कचरामुक्त’ करण्यासाठी सर्व उपाययोजना तातडीने राबविल्या जातील आणि परिसर स्वच्छ राहील याची खात्री केली जाईल"
- सतीश बनसोडे
आरोग्य निरीक्षक, महापालिका
"काही नागरिक रात्री खासगी जागेत कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. मी स्वतः या भागाची पाहणी करून अधिक मनुष्यबळ आणि कचरावेचक गाड्या लावता येतील का, याची चाचपणी करत आहे."
- मयूरी कोकाटे, नगरसेविका
"आमच्या सोसायट्यांकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. महापालिका कर्मचारी काम करतात, पण नागरिक पुन्हा कचरा टाकत असल्याने तो कधीच स्वच्छ दिसत नाही. कचरा जाळल्यामुळे होणारे प्रदूषण आरोग्यासाठी घातक ठरत आहे."
- अन्नदा रानडे,सचिव, गुरू रामकृष्ण हाउसिंग सोसायटी, पाषाण