पुणे : वन जमिनीच्या नोंदीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना वनक्षेत्र सर्वेक्षक उदयसिंह भीमराव कुंभार (वय ४६, रा. दत्तनगर, कात्रज) याला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी (ता. २९) अरण्येश्वर चौकात करण्यात आली.
‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ४८) यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. वडगाव मावळ तालुक्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर पूर्वी वन विभागाच्या नोंदीत असलेली जमीन पुन्हा मूळ स्थितीत आणण्याचा आदेश महसूल विभागाने दिला होता. त्याबाबतच्या नोंदीसंबंधी आवश्यक कागदपत्रे (रिस्टोर्ड ऑर्डर) मिळविण्यासाठी त्यांनी वन विभागाच्या कार्यालयात अर्ज केला होता. या अनुषंगाने तक्रारदार चौकशी करण्यासाठी चार मार्च रोजी वन विभागाच्या सेनापती बापट रस्त्यावरील उपवनसंरक्षक कार्यालयात गेले होते. त्यावेळी वनक्षेत्र सर्वेक्षक कुंभार याने तक्रारदार यांच्याकडे सात लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम चार लाख रुपयांवर आली.
तक्रारदाराने १३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. पडताळणीत लाच मागणीची खातरजमा झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार २९ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी कुंभार याने तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सतीश वाळके यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.