मुंबई : सध्या राजकीय चर्चा रंगली ती म्हणजे मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या भेटीची. शनिवारी मोहित कंबोज यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचा आयोजन केलं होतं. वाढदिवसानिमित्त मोहित कंबोज यांनी अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजकांना निमंत्रित केलं होतं. मात्र निमंत्रितांमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याने आणि आदित्य ठाकरे हे वाढदिवसानिमित्त मोहित कंबोज यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
ज्या मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक आरोप केले होते, मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता त्या संघर्षाला पूर्णविराम लागला का? राजकीय वैर यानिमित्ताने संपलं का? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
खरंतर एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आणि मातोश्री बाहेर झालेला राडा याला काही वर्ष उलटून गेलेत. मात्र अजूनही कार्यकर्ते मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे शिवसेनेचा संघर्ष विसरलेले नाहीत. त्यात आता आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला लावलेली उपस्थिती चर्चेचा चांगलाच विषय बनली आहे. कारण मोहित कंबोज आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेना पक्ष कोटीच्या वेळी सुद्धा मोहित कंबोज शिंदे यांच्या शिवसेनेसोबत पाहायला मिळाले होते. आता या सगळ्या राजकीय वैरा नंतर हे सगळं विसरून आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या या लेकीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला फक्त आदित्य ठाकरेच नाही तर ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री आशिष शेलार, अमित साटम, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे हे राजकारणी त्यासोबतच रितेश देशमुख, संजय दत्त शाहरुख खान यांसारखे सेलिब्रिटी, त्यासोबतच अनंत अंबानी सुद्धा या वाढदिवसाला उपस्थित होते. मात्र या सगळ्या उपस्थित यामध्ये चर्चा झाली ती फक्त आदित्य ठाकरे यांची.
आदित्य ठाकरे यांच्या या वाढदिवसाच्या उपस्थितीने अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यावर सोशल मीडियावर सुद्धा त्यांना ट्रोलर्सला सामोरे जावे लागतंय. एकतर जे राजकीय वैर मागील काही दिवसांपासून कंबोज आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळालं होतं ते राजकीय वैर संपलंय का? या राजकीय संघर्षाला पूर्णविराम लागलाय का? की मग शिंदे शिवसेना आणि भाजपच्या नाराजीच्या चर्चा असताना भाजप नेत्यांसोबत अधिक जवळीक ठाकरेंच्या शिवसेनेकडून साधली जातीये का? अशी सुद्धा चर्चा आहे.
त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही राजकीय भेट नव्हती वैयक्तिक भेट होती आणि त्यात राजकारण आणू नये असं तरी म्हटलं जात आहे. असं असलं तरी या भेटीनंतर किंवा या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी लावलेली उपस्थिती, यानंतर मोहित कंबोज यांच्यासोबत राजकीय वैर संपलं की भाजपसोबतची ठाकरे यांच्या शिवसेनेची जवळीक वाढतेय? असे प्रश्न विचारले जात आहेत. हे सगळं घडत असताना राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र, याची प्रचिती मात्र येत आहे.
ही बातमी वाचा: