मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध भागातील 2640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे.2640 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी सुरु झाली आहे. या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 29 एप्रिलपर्यंत असून अनामत रक्कम जमा करण्याची मुदत 30 एप्रिल आहे. म्हाडाच्या या सोडतीत घराची सर्वात किंमत 26 लाख तर सर्वात महागड्या घराची किंमत 6 कोटी 82 लाख रुपये इतकी आहे. म्हाडानं घरांच्या सोडतीसाठी उत्पन्न गटानुसार अर्जदारांची चार गटात विभागणी केली आहे.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये 6 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये 9 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये 12 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये 12 लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
विशेष बाब म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2026 च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 858 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी 1408 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी 229 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
म्हाडाच्या या सोडतीमधील 1762 घरांचं बांधकाम सुरु आहे. विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 371 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (7) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त 188 सदनिकांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या 319 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
आणखी वाचा