भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : शहरातील मुख्य बाजारपेठ पारनाका येथील सुप्रसिद्ध श्री शनैश्वर मंदिर आणि श्री अंबेमाता मंदिराचा ३०वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शेकडो महिला व नागरिकांनी सत्यनारायण पूजेसह महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. मणीबाई मोहनलाल श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि व्यापारी मित्रमंडळ, बाजारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा वर्धापन दिन सोहळा झाला. शनिवारी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी श्री शनैश्वर व श्री अंबेमाता मंदिरात अभिषेक आणि श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. सायंकाळी श्रीराम महिला भजनी मंडळ (ब्राह्मण आळी) आणि श्री रुक्मिणी महिला भजनी मंडळ (वाणी आळी) यांच्या वतीने भजन कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.