घरी टॉयलेट कसलं आहे? काय काय खाता? यावेळी जनगणनेत विचारले जाणार हे 33 प्रश्न; कधीपासून होणार सुरुवात?
Tv9 Marathi March 31, 2026 12:45 AM

कोरोनामुळे 2021 साली होणारी जनगणना पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे भारतात गेल्या 15 वर्षांपासून जनगणना झालेली नाही. मात्र आता देशभरात 1 एप्रिलपासून जनगणना सुरू होणार असून त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळची जनगणना आधीपेक्षा वेगळी आणि अधिक व्यापक असणार आहे. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी सोमवारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल अशी माहिती देताना यात लोकांच्या जीवनशैलीशी संबंधित अतिशय सविस्तर प्रश्न विचारले जातील अशी माहिती दिली आहे. जनगणनेदरम्यान गोळा केलेली वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. ही माहिती माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गतही दिली जाणार नाही.

जात निहाय जनगणना कधी होणार?

यावेळी जनगणना दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची आणि त्यांच्या सुविधांची माहिती गोळा केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात घरातील सदस्यांची सामाजिक, आर्थिक आणि इतर माहिती गोळा केली जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच ‘सेल्फ एन्युमरेशन’ (स्वगणना)ची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामध्ये नागरिक स्वतः 15 दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन माहिती भरू शकणार आहेत. लोकांनी दिलेली माहिती कर्मचारी आणि अधिकारी घराला भेट देतील तेव्हा ओळखपत्रांच्या आधारे पडताळून पाहणार आहे. जातनिहाय जनगणनेचा विचार दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे अशी माहिती मृत्युंजय कुमार नारायण यांनी दिली आहे.

जनगणनेत हे 33 प्रश्न विचारले जाणार

सरकारने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 33 प्रश्न निश्चित केले आहेत. यामध्ये घराच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. घराच्या भिंती, छत आणि जमिनीचे बांधकाम कोणत्या साहित्याने केले आहे, घराचा वापर कशासाठी केला जातो आणि त्याची स्थिती कशी आहे. या प्रश्नांचा समावेश आहे. तसेच कुटुंबाशी संबंधित प्रश्नांमध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, सामाजिक गट (SC/ST/इतर), कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि वैवाहिक स्थिती हे प्रश्न असणार आहेत.

जनगणनेवेळी घरातील सुविधा याबाबतही सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. घराच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत, वीजपुरवठा, शौचालयाची उपलब्धता व प्रकार, सांडपाण्याची व्यवस्था, स्वयंपाकघर आणि गॅस कनेक्शन आहे की नाही. तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल, सायकल, दुचाकी किंवा कार आहे की नाही याबाबत देखील प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे यावेळेसची जनगणना खास ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.