मुंबई : राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांचं नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदसाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असून या आधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत दोन नावं होती चर्चेत, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती. मात्र शेवटी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरुवातीला अश्विनी भिडे यांच्या नावाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी रात्री अश्विनी भिडे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली. यानंतर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
अश्विनी भिडे या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकारी असून त्यांनी मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रोजेक्टच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे यांच्यासोबत मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता, संजय मुखर्जी यांचीही नावं चर्चेत होती. परंतु, या तीनही अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी निवड होणाऱ्या अश्विनी भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत. या आधी त्यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची धुराही सांभाळली आहे. अश्विनी भिडे यांना आयुक्तपदाचा तीन वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदी एक महिला आहेत आणि त्याचवेळी आयुक्तपदीही महिलेची नियुक्ती होणार असल्याने महापालिकेवर महिला राज आल्याची चर्चा आहे.
गेल्या काही काळापासून मुंबई महापालिकेच्या प्रशासनावर सातत्याने भ्रष्टाचाराचे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तपदाची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे आल्याने, महापालिका प्रशासनाची प्रतिमा सुधारण्याचं महत्त्वाचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.
ही बातमी वाचा: