पारगाव - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील तेजश्री हिंगे व अक्षय नवनाथ हिंगे या दांपत्याची शासनाच्या कृषी विभागात अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने या दांपत्याचे कौतुक होत आहे.
१८ मार्च २०२६ ला तेजश्री यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये मंडळ कृषी अधिकारी राजपत्रित अधिकारी गट- ब या पदासाठी निवड झाली आहे. अक्षय हिंगे यांचीही मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
ते सध्या पाटण (जि. सातारा) येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा (अवसरी बुद्रुक) येथे झाले. माध्यमिक शिक्षण गावातीलच विद्या विकास मंदिर येथे झाले रत्नाई कृषी महाविद्यालय (अकलूज) येथून कृषी पदवीचे शिक्षण घेतले.
तेजश्री यांचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर (जाधववाडी, जि. कोल्हापूर) येथे तर माध्यमिक शिक्षण गर्ल्स हायस्कूल, (मलकापूर) येथे झाले. त्यांनी कृषी विभागाची पदवीचे बीएससी ॲग्रीचे शिक्षण कोल्हापूर शासकीय महाविद्यालयात घेतले.