Velhe Crime : भेकर शिकार प्रकरणी वनविभागाकडून तीन जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त
esakal March 31, 2026 02:45 AM

वेल्हे, (पुणे) - आंबेगाव वनपरिमंडळातील वेल्हा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या राजगड तालुक्यातील रांजणे फाटा येथे भेकर (पिसोरी) शिकार प्रकरणी वन विभागाकडून रविवार (ता. 29) रोजी मोठी कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून, सोमवार (ता. 30) रोजी न्यायालयात हजर केले असता आरोपींना 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती राजगड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी दिली.

राजगड तालुक्यातील कोंडगाव येथील मारुती बबन दारवटकर व मौजे निगडे मोसे येथील दत्तात्रय लक्ष्मण नलावडे व गोरख हनुमंत नलावडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अटक केलेल्या आरोपींकडून भेकर (पिसोरी) या वन्य प्राण्यांचे मांस व शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 2 (1), 9, 48 (ए), 39,50,51 व भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे उल्लंघन असून अशा उल्लंघनाकरिता जास्तीत जास्त 7 वर्षे कारावासाची तसेच रु. 25000/-पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा हा अजामीनपात्र तसेच दाखलपात्र स्वरुपाचा आहे. यास्तव वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई येईल असा इशारा लांडगे यांनी दिला आहे.

सदर गुन्हयात एस. डी. अर्जुन, वनपाल आंबेगांव, आर. आर. निंभोरे, वनरक्षक नियतक्षेत्र रुळे, व्ही. एस. निकम, वनरक्षक दापोडे, ए. आर. सोनकांबळे वनरक्षक आंबवणे, एन. पी. रासकर वनरक्षक केळद यांनी अवैध शिकारीचा प्रकार चालू असून शिकारी रिक्षा क्र. MH-12-VW-6394 या रिक्षा मधून शिकारीसाठी आल्याची गुप्त बातमी मिळाले सदर ठिकाणी सापळा रचुन मौजे रांजनेफाट्यावर तीन आरोपींसह वन्यजीव भेकर तथा पिसोरी या वन्यप्राण्याचे मास पकडण्यात आले.

डिसेंबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंत वन्य प्राणी शिकार प्रकरणी राजगड तालुक्यात वनविभागाकडून 14 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती लांडगे यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.