IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना
esakal March 31, 2026 02:45 AM

RR vs CSK Marathi News) इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील तिसरा सामना काहीसा भावनिक आहे. इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत एक गोष्ट घडली आहे.

हा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानात गुवाहाटीमध्ये खेळत आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी अडखळलेली दिसली. त्यांना राजस्थानसमोर केवळ १२८ धावांचेच लक्ष्य देता आले आहे.

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

दरम्यान, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला. चेन्नईचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी (MS Dhoni) पोटरीच्या दुखापतीतून सध्या सावरत आहे. त्यामुळे तो पहिल्या दोन आठवड्यातील सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

पण यामुळे केवळ ६ व्यांदा धोनी आयपीएलमध्ये चेन्नईचा सामना मुकला आहे. याआधी शेवटचा तो ७ वर्षांपूर्वी चेन्नईकडून सामना मुकला होता. तो शेवटचे २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्याला मुकला होता. त्यानंतर गेली ७ वर्षे धोनी चेन्नईसाठी सर्व सामन्यात खेळला आहे.

२७७ सामन्यांनंतर पहिल्यांदाच...

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा हा २७८ वा सामना आहे. पण पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स एमएस धोनी किंवा सुरेश रैना (Suresh Raina) या दोघांशिवाय मैदानात उतरले आहेत. याआधी खेळलेल्या २७७ टी२० सामन्यांत चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनी किंवा रैना या दोघांपैकी किमान एक तरी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला आहे.

यापूर्वी ज्यावेळी धोनी चेन्नईसाठी खेळलेला नाही, त्यावेळी रैना चेन्नईकडून खेळला आहे. तसेच रैना नसताना धोनी चेन्नईसाठी खेळलेला आहे. त्यामुळे हा या दोघांशिवाय चेन्नईचा पहिलाच सामना आहे.

रैना आणि धोनी २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. रैना २०२१ नंतर आयपीएलमधूनही निवृत्त झाला. त्याने शेवटचा सामना २०२१ आयपीएलमध्येच राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला होता. धोनी अद्याप आयपीएलमध्ये सक्रिय आहे. पण तो सध्या दुखापतीमुळे चेन्नईसाठी उपलब्ध नाही.

IPL 2026, RR vs CSK: धोनीशिवाय चेन्नई मैदानात, संजू सॅमसनचं पदार्पण, तर जडेजाची राजस्थानसाठी घरवापसी; पाहा प्लेइंग इलेव्हन चेन्नईची फलंदाजी कोलमडली

दरम्यान, पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी कोलमडली. चेन्नई सुपर किंग्सचा संघ १९.४ षटकात १२७ धावांवर सर्वबाद झाला. चेन्नईसाठी एकट्या जेमी ओव्हर्टनने झुंज दिली. त्याने ३६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय फक्त सर्फराज खान (१७) आणि कार्तिक शर्मा (१८) यांनीच दुहेरी धावसंख्या पार केली.

राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.