सिलिंडर नोंदणीत २० हजारांनी घट
नवीन नियमावलीचा परिणाम; प्रतीक्षा यादी सव्वादोन लाखांवर
ठाणे, ता. ३० : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम खनिज तेल आणि गॅस वाहतुकीवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी नवीन नियमावली लागू केल्यामुळे ठाणे जिल्ह्यात गॅस बुकिंगच्या संख्येत मोठी घट झाली आहे. प्रतिदिन होणारी ८० हजार बुकिंग आता ६० ते ६५ हजारांवर आली असून, दोन लाख ८० हजारांची वेटिंग लिस्ट सव्वादोन लाखांवर स्थिरावली आहे.
शिधावाटप विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. ज्या ग्राहकांकडे दोन सिलिंडर आहेत त्यांच्यासाठी बुकिंगचा कालावधी २५ दिवसांऐवजी आता ३५ दिवस करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे एकच सिलिंडर आहे त्यांच्यासाठी २५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी जैसे थे ठेवण्यात आला आहे.
इराण, अमेरिका आणि इस्राईलमधील तणावामुळे जागतिक स्तरावर गॅसपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतातही अनेक ठिकाणी गॅससाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन शिधावाटप कार्यालयाने केले आहे. दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा काही दिवसांपासून विस्कळित असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे हाल होत आहेत.
काळाबाजार रोखण्यासाठी दक्षता
गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ठाणे शिधावाटप कार्यालयाने विशेष निरीक्षकांची नेमणूक केली आहे. जिल्हाभरातील साठ्यावर बारीक लक्ष ठेवले जात असून, वितरणात पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घरगुती गॅसचा नियमित पुरवठा सुरू आहे. मध्यंतरी अफवांमुळे भीतीपोटी बुकिंगची संख्या वाढली होती. ती आता कमी झाली आहे. सध्या प्रतिदिन ६० ते ६५ हजार बुकिंग होत असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
- प्रशांत काळे, उपनियंत्रक - शिधावाटप, फ परिमंडळ, ठाणे