Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
esakal April 01, 2026 12:45 AM

अकोला - पातूर व बाळापूर तालुक्यात ३० मार्च रोजी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग व इतर शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पातूर तालुक्यात अनेक भागात गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला असून पिक नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याची सूचना आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पत्राद्वारे केली आहे.

पातूर व बाळापूर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकांसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी कापणीसाठी ठेवलेले धान्य भिजून खराब झाले, तर फळबागांमध्ये पडझड झाली. पातूर तालुक्यातील सस्ती व इतर भागांत बोराएवढी गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळे या भागातील गहू, कांदा, लिंबू, आंबा, पपई, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

चतारी, सांगोला, सांगेफळ, पिंपळखुटा, दिग्रस, तुलंगा, मळसूर, शिरला, नांदखेड, बाबुळगाव, भंडारज, तांदळी, कोठारी, आलेगाव, आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळू शकेल, अशी सूचना आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

वीट उत्पादक व्यावसायिकांचे नुकसान

अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे बाळापूर तालुक्यातील विटभट्टयांवरील कच्च्या विटाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचीही जिल्हाप्रशासनाने दखल घेण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.