Hingne Mala Canal Nuisance: हिंगणे मळा नवा कालवा मद्यपींचा अड्डा; महिलांची पोलिसांकडे सुरक्षिततेची जोरदार मागणी
esakal April 01, 2026 02:45 AM

हडपसर : येथील हिंगणेमळा परिसरातील कालव्याचा परिसर सध्या बेकार तरुण व तळीरामांचा अड्डा बनला आहे. भांडणे, आरडा-ओरडा, वादविवाद, दारूच्या बाटल्यांच्या काचा आणि घाणीचे साम्राज्य यामुळे येथील रहिवासी विशेषता महिलांना भीतीच्या छायेत वावरावे लागत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्याने परिसरातील महिलांनी पोलिसांना प्रत्यक्ष बोलावून आपले गाऱ्हाणे त्यांच्या समोर मांडले.

या परिसरातून वाहणाऱ्या नवीन कालव्याची कुंपण भिंत, कालव्यावरील भराव व अस्ताव्यस्त पार्किंग केलेली वाहने आदी ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तळीराम टोळक्याने मद्यपान करीत बसलेले असतात. हे तळीराम येथून ये-जा करणारे प्रवासी, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना शिवीगाळ किंवा अश्लील भाषेत टोमणे मारीत असतात. त्यामुळे येथून प्रवास करताना महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत असून असुरक्षितताही निर्माण झाली आहे. ही बाब गंभीर असल्याने काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी येथील "श्री काळभैरवनाथ" मंदिरात लोक अदालत भरवून महिलांची गाऱ्हाणी ऐकून घेत कारवाईचे आश्वासन दिले.

माजी नगरसेवक व सावली फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश ससाणे, योगेश हिंगणे, विनोद ससाणे, ज्ञानेश्वर हिंगणे, अनिता हिंगणे, सुचिता हिंगणे, रूपाली हिंगणे, ऐश्वर्या हिंगणे, सुरेखा हिंगणे, लक्ष्मी हिंगणे, मंदाबाई हिंगणे, जयश्री हिंगणे, शोभा हिंगणे, सुलभा हिंगणे, अर्चना हिंगणे, कुसुम हिंगणे, स्वप्नाली हिंगणे, सतीश हिंगणे, राजेंद्र हिंगणे, संदीप हिंगणे, आण्णा वाडकर, शुभम हिंगणे यांच्यासह सुमारे अडीचशे महिला यावेळी उपस्थित होत्या. पोलिसांनी या ठिकाणी वेळोवेळी कारवाई करून आम्हाला सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित महिलांनी केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील म्हणाले, "सध्या सायबर, आर्थिक आणि समाज माध्यमावरील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर नशेडी व टवाळखोरांचा त्रासही वाढत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. काही गैरप्रकार दिसल्यास तातडीने ११२ क्रमांकावर माहिती द्यावी. त्यातूनच कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.