नाशिक : भोंदू कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासात नवे खुलासे उघड होत असताना, त्याची पत्नी कल्पना (आधीची सुनीता) खरात (Kalpana Kharat) हिच्याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या कल्पनाचे माहेर सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात असून, तेथे आजही तिचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याची माहिती आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात तिचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. अटकेची शक्यता वर्तवली जात असतानाच पोलिस पथक कर्मयोगीनगरमधील ‘तृप्तबाला’ बंगल्यावर पोहोचले होते, मात्र त्यापूर्वीच ती फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
कल्पनाच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांत दुर्दैवी घटना कोसळल्या आहेत. तिच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला, तर वडिलांचे आजाराने निधन झाले. सध्या घरात वृद्ध आई, विधवा भावजयी आणि लहान भाचा असेच सदस्य असून त्यांची परिस्थिती दयनीय असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अशोक खरातचे लग्न उशिरा होत असल्याने एका नातेवाइकामार्फत कल्पनाशी त्याचा विवाह जुळवून आणण्यात आला. वयात मोठा फरक असूनही लग्नाचा खर्च खरात कुटुंबीयांनी उचलण्याची तयारी दर्शवल्याने हे लग्न ठरल्याची माहिती आहे.
तपासादरम्यान एसआयटीने खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी तृप्ताबाला यांना ताब्यात घेतले आहे. तर फरार असलेल्या कल्पनाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पुण्यात रवाना झाल्याचे समजते. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लग्नानंतर कल्पनाचे आयुष्य पूर्णपणे बदलले आणि ती ऐशोआरामी जीवनात रमली. मात्र, या बदलासोबतच तिचे माहेराशी संबंध हळूहळू दुरावले. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, ती क्वचितच पाडळी येथे येत असे आणि कुटुंबीयांशी तिचा संपर्कही कमी झाला होता. तिचा एक भाऊ सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ‘शिव संकल्प हार्डवेअर’ या दुकानाचा व्यवसाय पाहत असून, दुसरा भाऊ नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्याआधी रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एसआयटीचे पथक खरातच्या घरी जाण्याअधीच खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली. तर खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्यानं त्याच्या समोर मुलाची चौकशी होणार आहे. अशोक खरात सहकार्य करत नाही, स्पष्ट माहिती देत नसल्यानं तपास पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातकडून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याच्या पत्नीला अटक करण्याचं एसआयटीचे लक्ष आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणाचा गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. आज अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी पक्ष काय बाजू मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.