Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड
esakal April 01, 2026 12:45 PM

अकोला: जिल्ह्यात इतर खेळांच्या तुलनेत सतत आघाडीवर असणाऱ्या बॉक्सरांनी पदकांच्या कमाईसह क्रीडा शिष्यवृत्ततही आघाडी घेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या क्राडी शिष्यवृत्तीत जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड झाली आहे हे विशेष.

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंना महाराष्ट्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला असून, एकूण ४३ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे २१ खेळाडू बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील असून, जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाची वाढती ताकद अधोरेखित झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवून प्राविण्य मिळवणाऱ्या या खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने त्यांच्या पुढील प्रशिक्षणास मोठी चालना मिळणार आहे.

Panchang : १ एप्रिल 2026 पंचांग! शुभ मुहूर्त, राहू काळ व आजचे संपूर्ण दिनविशेष

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व प्राविण्यानुसार (सुवर्ण पदक ११ हजार २५० रुपये, रजत पदक आठ हजार ९५० रुपये, कांस्य पदक सहा हजार ७५० रुपये, तसेच सहभागी खेळाडूंना तीन हजार ७५० रुपये) विविध रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते. ज्यामुळे खेळाडूंच्या प्रशिक्षण, आहार व साहित्य खर्चास मदत होते.

करिअर वेध : प्रामाणिकपणा, नैतिकता व जीवनमूल्ये

या यादीत विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र, बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक २१ खेळाडूंनी शिष्यवृत्ती मिळवत आघाडी घेतली आहे. पालक व प्रशिक्षकांनीही शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत खेळाडूंना मिळणारे आर्थिक बळ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. शिष्यवृत्तीमुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळणार असून, अधिकाधिक विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

हे खेळाडू ठरले पात्र

रोहन चिंचोळकर, श्रेयश राठोड, आकाश खंडारे, अरहान खान, अथर्व भट्ट, भारती कवाळे, भारती चौंगडे, चेतना अंभोरे, गार्गी राऊत, गोपाल गणेशे, हर्षदीप जाधव, ऋषिकेश चव्हाण, इशिका झांबरे, मयंक अंभोरे, मोहम्मद उमर फारूक मोहम्मद रफीक, रवींद्र पाडवी, रेहान हुसेन, रिझवान शाह, समीक्षा सोळंकी, शाश्वंत महल्ले, श्रद्धा खोब्रागडे, वेदश्री गोतमारे, विवेक तायडे, देवांशी गावंडे, श्रेयश उपरवट, तन्मय शर्मा, भक्ती काटकर, राहुल सांगळे, आदित्य शळके, निरवान नरवाडे, प्रणव राहुडकर, रवींद्र घोडे, मृणाली गाडे, वेदिका जायले, अनुष्का तेलगोटे, अथर्व गावंडे, तोशीट गुल्हाडे, यथार्थ कांबळे, शेख अस्लाम, श्रृती श्रीनाथ.

"क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या ४३ खेळाडूंपैकी तब्बत २१ खेळाडू बॉक्सिंगचे आहेत. त्यामुळे इतर खेळ प्रकारातील खेळाडूंनीही अधिक मेहनत घेऊन क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हावे. खेळाडूंना लागणाऱ्या सर्व सुविधा देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहमी प्रयत्नशील आहे."

- सतीशचंद्र भट्ट, जिल्हा क्रीडाधिकारी, अकोला.

"राज्य शासनाकडून मिळत असलेली क्रीडा सवलत खेळाडूंसाठी मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. बॉक्सरांची संख्या इतर खेळाच्या तुलनेत जास्त असल्याने इतर खेळाडूंही मेहनत घेणे गरजेचे आहे."

- हरिश उंबरकर, नागरिक, अकोला.

"इतर खेळाच्या तुलनेत बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी यश मिळाले आहे. इतर खेळाडूंनीही मेहनत घ्यावी."

- कमलेश भरणे, नागरिक, अकोला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.