मार्च 2026 मध्ये जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘चिरैया’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. दमदार कथानकामुळे अवघ्या काही दिवसांतच ही सीरिज सोशल मीडियावर चर्चेत आली आणि ओटीटीवर ट्रेंड होऊ लागली. या चित्रपटाशी संबंधित बरेच रील्स आणि पोस्ट सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.
ही वेब सीरिज ‘मॅरिटल रेप’सारख्या (वैवाहिक बलात्कार) गंभीर विषयावर आधारित आहे, ज्याला समाज चुकीचा मानत नाही आणि कायदा गुन्हा मानत नाही. यामध्ये दिव्या दत्ता, संजय मिश्रा, प्रसन्ना बिष्ट आणि सिद्धार्थ शॉ यांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘चिरैया’मध्ये लखनौमधल्या एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. जिथे मुखिया पापाजी (संजय मिश्रा) यांचं साहित्यिक क्षेत्रात मोठं नाव असतं. ते महिलांचे अधिकार, न्याय, बरोबराची साथ, चुकीचा विरोध यांबद्दल बरंच काही बोलतात. तर या कुटुंबाची मोठी सून कमलेश (दिव्या दत्ता) ही अत्यंत संस्कारी आणि सर्वांची काळजी घेणारी आहे.
सिद्धार्थ शॉ याचा जन्म लखनौमध्ये झाला असून तो दिल्लीत लहानाचा मोठा झाला. त्याने रंगभूमीवर काम करत करिअरची सुरुवात केली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी त्याला इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव आज कल’ या चित्रपटात कार्तिक आर्यनच्या मित्राच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती.
सिद्धार्थने ‘क्रिमिनल जस्टीस’च्या तिसऱ्या सिझनमध्येही भूमिका साकारली होती. यामध्ये तो रौनकच्या भूमिकेत झळकला होता. याशिवाय ‘नॉट डेटिंग’ आणि ‘दो गुब्बारे’ यांसारख्या शोजमध्येही त्याने काम केलंय.