श्रीनिवास हेमाडे
वाद-संवाद शहाण्या आणि विद्वान लोकांमध्ये घडावा, अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात परिषद, चर्चासत्र, परिसंवाद (आजच्या भाषेत समाज माध्यमे) इत्यादी ठिकाणी ज्ञानी वाद-चर्चेसाठी गेलाच तर तिथे त्याला शहाणा अन् ज्ञानी चर्चक भेटेल असे नाही, मूर्ख माणूसही भेटू शकतो; पण ‘मूर्ख भेटेल’ हे आधी माहीत नसते. म्हणून महर्षी चरकाचार्य परिषदेचे दोन प्रकार करतात : ज्ञानवती परिषद आणि मूढ परिषद. ज्ञानी चर्चकांची ‘ज्ञानवती परिषद’ आणि मूर्ख लोकांची ‘मूढ परिषद’. तथापि ज्ञानी व मूर्ख लोकांमध्येही काही प्रकार होतात. म्हणून चरकाचार्य पुन्हा ज्ञानवती आणि मूढ या दोन मुख्य परिषदांचे प्रत्येकी तीन उपप्रकार करतात (सुहृत्परिषत्, उदासीन परिषत्, प्रतिनिविष्ट परिषेच्चेति) :
अ) ज्ञानवती परिषदेचे उपप्रकार
ज्ञानवती सुहृद : शहाण्या व ज्ञानी मित्रांची निश्चित तर्कशुद्ध निर्णय देणारी परिषद.
ज्ञानवती उदासीन : ज्ञानी मित्रांची, पण हारजीत, यथार्थ निष्कर्षाप्रति उदासीन परिषद.
ज्ञानवती प्रतिनिविष्ट : ज्ञानी मित्रांची, पण ‘माझेच खरे’ वाल्या दुराग्रही अहंकारी विद्वानांची परिषद.
ब) मूढ परिषदेचे उपप्रकार
मूर्खांच्या परिषदेचे उपप्रकार स्पष्ट करताना मूळ चरक संहितेत ‘मूढ परिषदेचेही असेच वरीलप्रमाणे प्रकार होतात’, एवढेच नमूद केले आहे (मूढायां तु सुहृत्परिषद्युदासीनायां वा ज्ञानविज्ञान...) पण मूर्ख लोकांमध्ये शत्रूच असतात असे नाही; तर अनेकदा आपले मित्रही मूर्ख असतात. त्यामुळे मूढ परिषदेचे तीन प्रकार होतात :
मूढ सुहृद परिषद : कोणताही निश्चित तर्कशुद्ध निर्णय न देणारी मूर्ख मित्रांची परिषद.
मूढ उदासीन परिषद : हारजीत, निष्कर्षाप्रति उदासीन शत्रू मूर्खांची परिषद.
मूढ प्रतिनिविष्ट परिषद : ‘माझेच खरे’ वाल्या दुराग्रही अहंकारी शत्रू मूर्खांची परिषद.
चरकाचार्य म्हणतात, ‘ज्ञान, विज्ञान, वचन (प्रश्न), प्रतिवचन (उत्तर) यांनी युक्त असलेल्या ज्ञानी परंतु दुराग्रही अहंकारी लोकांच्या परिषदेमध्ये कोणत्याही शहाण्या विद्वानाने वाद करू नयेच; पण मूर्ख, अज्ञानी, दुराग्रही शत्रू (प्रतिनिविष्ट) लोकांच्या कळपातही शहाण्याने जाऊ नये.(तत्र प्रतिनिविष्टायां परिषदि ज्ञानविज्ञान वचनप्रतिवचन शक्ति संपन्नायां मूढायां वा न कथंचित केनचित सह जल्पो विधीयते )
मग कुणाशी वाद घालावा? तर तीन प्रकारे वाद करावा, असे चरकाचार्य स्पष्ट करतात.
वादाचे तीन उपप्रकार
(१) पहिला प्रकार : शहाण्यांच्या ज्ञानवती सुहृद (मित्र) परिषदेत वाद करण्यास प्राधान्य द्यावेच; शत्रूंमध्ये जसे काही मूर्ख असतात तसेच मित्रांमध्येही काही मूर्ख असतात, हे लक्षात ठेवून या सर्व नामांकित शत्रू-मित्र मूर्खांशी बोलताना मोठमोठी लंबीचवडी, एकमेकांत गुंतलेली वाक्ये करावीत, त्यांना समजणारच नाहीत अशी दुर्बोध भाषा वापरावी (जल्प). त्यांना म्हणावे, ‘‘तुम्ही तर्कशुद्ध युक्तिवाद करू शकत नाही, याचाच अर्थ तुमचा पराभव झाला आहे...’’ समजा त्याने पुन्हा (मुर्खासारखे) चर्चेसाठी बोलाविले तर म्हणावे, ‘‘तू आणखी वर्षभर अभ्यास कर, जा.’’ आणि असे वारंवार म्हणत राहावे.
(२) दुसरा प्रकार : दोन्ही प्रकारच्या परिषदेत जर कुणी आपल्यापेक्षा कमी दर्जाचा असेल अथवा समान दर्जाचा एखादा मित्रही असला आणि तो मित्र प्रस्तुत चर्चा विषयाच्या संदर्भात विरुद्ध पक्षात असला तर तो विरोधक आहे, असे सिद्ध झालेले असते. अशा प्रसंगी चर्चाविषय शत्रू बनलेल्या (व्यक्तिगत शत्रू नव्हे) त्या मित्रालादेखील शत्रूच समजावे. मग त्या सर्व शत्रूंशी जोरदार ‘विग्रह’ वाद करावा, त्यांना हरवावेच.
(३) तिसरा प्रकार : समजा ‘एखाद्या परिषदेला आपण गेलो आहोत आणि ती परिषद निर्णयाबाबत उदासीन आहे’, असे प्रथमदर्शनी जाणवले; पण त्याच वेळी ती परिषद शहाण्या व ज्ञानी चर्चकांची आहे की मूर्खांची आहे, तसेच मित्रांची आहे की शत्रूची आहे, विरोधी बाजूत केवळ शत्रूच आहेत की आपले मित्रही विषयाच्या विरोधी आहेत, हेच अजून माहीत झालेले नाही’, अशी स्थिती असेल तर कोणता निर्णय घ्यावा? तर चरकाचार्य म्हणतात, ‘‘जर ती परिषद अवधान श्रवण (आपले तर्क व युक्तिवाद लक्षपूर्वक ऐकणारे) संपन्न, वचन-प्रतिवचन युक्त ज्ञानी लोकांची (मग ते मित्र असो की शत्रू) परिषद असेल तर तिथे आपले म्हणणे नम्रपणे मांडावे. अर्थात सावधगिरी म्हणून आधी चाचपणी करावी. जर ती परिषद ऊर्फ प्रतिवादी पक्ष प्रस्तुत चर्चा विषयाच्या संदर्भात सबल असेल तर जल्प, वितंडा होणार नाही, अशी काळजी घ्यावी. त्यांच्याशी सहकार्य करून आपण स्वतः न्याय्य निर्णयाकडे यावे, त्यांनाही उद्युक्त करून त्या निर्णयाला येण्यास मदत करावी, अर्थात संधाय संभाषा करावी. पण जर ती परिषद प्रस्तुत चर्चा विषयाच्या संदर्भात अज्ञानी, दुर्बल, मूर्ख असेल (आणि त्या परिषदेत मित्र असले तरी ते विरोधक असल्याने) त्या विरोधकांवर विजय मिळविण्यात बिलकूल हयगय करू नये. कारण वाद-संवादाचा हेतू ‘तत्त्वाचे रक्षण’ या ‘सत्या’च्या प्रस्थापनेसाठी असतो, व्यक्तीसाठी नाही.