Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती उघड
esakal April 02, 2026 12:45 PM
Nashik Live भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती उघड

नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. खरातने रोख व्यवहारांच्या माध्यमातून मोठे आर्थिक जाळे उभे केल्याचे स्पष्ट होत असून त्याच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस आले आहेत. कोणताही अधिकृत हिशोब न ठेवता व्यवहार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत त्याच्या बँक खात्यांची तीन वेळा तपासणी करण्यात आली असून व्यवहारांची साखळी उलगडण्याचे काम वेगाने सुरू आहे. मोबाईल डेटामधूनही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. गेल्या चार वर्षांत तब्बल सत्तर कोटींची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले असून नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. बहुतांश व्यवहार रोख रकमेनेच केल्याचे तपासात दिसून आले आहे. अनेक व्यवहारांमध्ये इतरांची नावे भागीदार म्हणून वापरल्याचेही उघड झाले आहे. तसेच नाशिकमधील बंगला आणि कार्यालयाचे काम करणाऱ्या कामगारांना सुमारे पंचवीस लाख रुपये रोख दिल्याची माहितीही समोर आली आहे.

Sangli Politics : महाविकास आघाडीचे चारही सदस्य सभापती निवडीत बिनविरोध विजयी

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत पराभव झाला तरी सभापती निवडीत चमत्कार करू, असे भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले खरे मात्र प्रत्यक्षात विजयाइतके संख्याबळच होऊ न शकल्याने महायुतीने सभापती निवडी प्रक्रियेतून माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही सदस्य सभापती निवडीत बिनविरोध विजयी झाले.

Case Filed Against Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींविरोधात आणखी एक गुन्हा

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज आणखी एक फसवणूक, गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला. ही कारवाई जीवन विमा महामंडळाच्या तक्रारी आधारे करण्यात आल्याचे सीबीआय प्रवक्त्याने स्पष्ट केले.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

नाशिक : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. खरातने मृत्यूची भीती दाखवून जमीन हडपल्याचा आरोप आहे. मृत्यूची भीती दाखवून १६ लाखांची जमीन ४ लाखांमध्ये हडपली आहे. हडपलेल्या मिरगावमधील जमिनीवरच ईशान्येश्वर मंदिर बांधलंय. जमीन शापित असल्याचा बनाव करत जमीन हडपल्याचा मूळ जमीन मालकांचा आरोप आहे.

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या हनुमानाचं जन्म गाव म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबक रोडवरील अंजनेरी येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालीये. सकाळी सहा वाजून 28 मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अंजनेरी येथे गेल्या चार दिवसांपासून हा जन्मोत्सव साजरा केला जातोय. आज पहाटेपासून हनुमानाच्या वस्त्रांची मिरवणूक काढत पूजा करून हनुमानला वस्त्र घालण्यात आले. त्यानंतर जन्मोत्सव साजरा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

Nagpur Rain : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

उपराजधानी नागपुरात हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. रात्री जोरदार पावसाची हजेरी पहायला मिळाली. विजांच्या कडकडाटासह रात्री आलेल्या पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी पाहायला मिळत होती.

Jyotiba Chaitra Yatra : चैत्री यात्रेत श्री जोतिबा देवाच्या चरणी लाखो भाविक लीन

Latest Marathi Live Updates 02 April 2026 : चैत्रातील कडक उन्हाने घामाने भिजलेले भाविक आणि त्यातच सायंकाळी चारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने यंदाची जोतिबाची चैत्र यात्राही लाखो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली. गुलालात रंगलेले भाविक पावसात चिंब भिजतानाच भक्तिरसात तल्लीन झाले. हलगी, घुमके, व्हलेरबाजा, सनईच्या मंगलमय सुरात तरुणाईनेही आनंदोत्सव साजरा केला. आकाशाला गवसणी घालणाऱ्या विविधरंगी सातशे-आठशे सासनकाठ्यांच्या साक्षीने श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे हा सोहळा अमाप उत्साहात सजला. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.