- डॉ. मालविका तांबे
सध्याच्या काळात रोगांमध्ये ॲलर्जीचं प्रमाण सगळ्यात जास्त दिसतंय. दूध, शेंगदाणे, गहू, अंडी, मासे, तीळ अशांसारखे खाद्यपदार्थ व तसेच परागण, धूळ, पाळीव प्राण्यांचे केस इत्यादी कितीतरी गोष्टींची ॲलर्जी सगळीकडे सध्या सामान्य त्रास बनत चाललेली आहे. सर्दी, खोकला, पोटामध्ये दुखणे, अतिसार होणे, त्वचेवरती पुरळ उठणे हे सामान्य त्रास तर आपल्याला ॲलर्जीमध्ये दिसतातच.
पण पाश्चात्य देशातून येणाऱ्या बऱ्याचशा व्यक्तींमध्ये अमुक गोष्ट खाण्यात आली किंवा त्या गोष्टीच्या ते संपर्कात आले तर लगेचच मोठा त्रास होऊन दवाखान्यात भरती करण्याची वेळ येते, अशाही प्रकारच्या ॲलर्जी सध्या दिसताहेत. एवढेच नव्हे तर नवजात शिशू ज्यांनी अजून आयुष्य सुरूच केलेलं नाहीये, त्यांनासुद्धा त्वचेवरती ॲलर्जीक रॅश येणे व तसेच जन्मापासूनच लेकटोझ इनटोलरन्स असणे हेसुद्धा सध्या सामान्य बाब होत चाललेली आहे.
निसर्गाचा हा नियम आहे की कुठलेही दोन पदार्थ एकत्र आले की त्याचं सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे प्रभाव आपल्याला दिसू शकतात. उदाहरणार्थ, स्टीलच्या वाटीमध्ये ताकात काळं मीठ, जिरं घालून प्यायलास कुठलीही रासायनिक प्रक्रिया होत नाही. पण तेच चांदीच्या वाटीमध्ये काळं मीठ घातल्यास लगेचच चांदी काळी पडताना दिसते. एवढेच नव्हे तर पितळीच्या कलई न केलेल्या पातेल्यामध्ये कुठलीही आंबट गोष्ट शिजवली तर तिची चव संपूर्णपणे बदलून जाते. तसेच दुधामध्ये कुठल्याही आंबट फळाचा रस घातला तर दूध लगेच खराब होते. पण तेच साखर घातल्याने त्या दुधाचे गुण वाढतात.
आयुर्वेदामध्ये ॲलर्जीला ‘असात्म्य’ असणं असं म्हणता येऊ शकतं. अर्थात जेव्हा दोन गोष्टी एकत्र एकमेकाला सकारात्मकपणे पूरक ठरत नाही त्याला आपण ॲलर्जी म्हणू शकतो. जेव्हा एखादी गोष्ट शरीराच्या आतल्या वात, पित्त, कफ, पाचन अग्नि यांच्या संपर्कात येते, तेव्हा असंतुलन निर्माण करणाऱ्या काहीतरी प्रक्रिया शरीरामध्ये सुरू होतात आणि त्याचा त्रास काही ठरावीक जागेवरती किंवा संपूर्ण शरीरावरती होताना दिसतो.
या ॲलर्जीस मध्ये कधीतरी त्वचेवर पुरळ उठतं, पुटकुळ्या उठतात, भरपूर प्रमाणात खाज सुटते, लालसरपणा येतो, कधीतरी नाक गळतं, डोळे झोंबतात, डोकं दुखतं, सर्दी होते, खोकला होतो किंवा पोटात दुखतं. अतिसार अर्थात loose motions होतात किंवा श्वास घेण्यामध्ये अवरोध उत्पन्न करण्यासारखे anaphylactic shock असेही त्रास होताना दिसू शकतात.
ॲलर्जीची कारणे
आहार हा शरीरामध्ये ॲलर्जी सुरू होण्याचं सगळ्यात मोठं कारण ठरू शकतं. आयुर्वेदामध्ये अन्नाची प्रकृती व खाणाऱ्या व्यक्तीची प्रकृती ही एकमेकाला सातम्य असली पाहिजे असं सांगितलेलं आहे.
1) सध्याच्या काळात स्वतःची पचनशक्ती, आजूबाजूचं वातावरण, ऋतू कशाचाही विचार न करता अन्नपदार्थांचं सेवन केलं जातं. उदाहरणार्थ, थंडीच्या दिवसांमध्ये आवडतं म्हणून सीताफळ खाणं, केळं खाणं हे दोन्हीही शरीराला तापमान नियंत्रण करायला त्रासदायक ठरू शकतं आणि त्याच्या शीतल गुणधर्माचा अतिरेक होऊन त्वचेवरती पुरळ उठणे किंवा सर्दी खोकल्यासारखा त्रास होताना दिसू शकतो.
2) विरुद्ध गुणधर्म असलेले कुठलेही पदार्थ आयुर्वेदामध्ये वर्ज्य सांगितलेले आहेत. याला आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, मीठ किंवा माशांबरोबर किंवा फळाबरोबर दूध एकत्र करून घेणे, अंडी आणि दूध एकत्र घेणे, लिंबाबरोबर दही घेणे किंवा tomato खाणे. दह्याबरोबर गरम चहा किंवा कॉफी पिणे हे सगळं विरुद्ध आहारात मोडतं.
3) फ्लॉवर कोबी, मशरूम, अंडी, नवा भात, सीताफळ, चीझ, आइसक्रीम या सगळ्या गोष्टी आहारात फार प्रमाणात ठेवणे हेसुद्धा ॲलर्जीचं कारण ठरू शकतं. तसेच फार जास्त मसालेदार, तळलेले, तिखट पदार्थ किंवा चिंच, अननस यांसारखे आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानेसुद्धा त्रास होताना दिसू शकतो.
4) आजच्या काळामध्ये आपल्या आहारामध्ये खूप प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक द्रव्य वापरलेले दिसते. उदाहरणार्थ preservatives, fertilizers, pesticides, रंग, thickners, acidity regulators व तसेच बऱ्याच प्रमाणात रासायनिक औषधंसुद्धा घेतली जातात. ही सगळी रसायने शरीराच्या आत जाऊन आपल्या अग्नीला दूषित करतात, पर्यायाने शरीरात आम वाढतो. याच्यानेसुद्धा शरीरामध्ये ॲलर्जी वाढू शकते.
ॲलर्जी कमी करण्याकरिताचे उपाय
ॲलर्जीक त्रास कमी ठेवायचा असेल तर शक्यतो फार जास्त गार पदार्थ पिणं, एररेटेड सोडा ड्रिंक्स घेणं, दही, आंबवलेले पदार्थ, ब्रेड इत्यादी फार प्रमाणात घेणं टाळलेले जास्त बरे.
फार दिवस गोठवून ठेवलेल्या गोष्टी, फ्रिजमध्ये ठेवलेल्या गोष्टी किंवा शेल्फ लाइफ जास्त प्रमाणात असलेले आहार पदार्थ वर्ज्य केलेले जास्त उत्तम राहतात.
आहारामध्ये सूंठ, आलं, चांगल्या प्रतीची हळद, चांगल्या प्रतीचे मध, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता अशा प्रकारच्या मसाल्यांचा वापर केल्याने ॲलर्जीक त्रास कमी व्हायला मदत मिळते.
संतुलनचे सीतोपलादी चूर्ण, हरिद्रा खंड, त्रिकटू चूर्ण हे घेतल्यास प्राथमिक उपचारासारखे मदत करू शकतात.
दिवसातून एकदा अर्धा चमचा तुळशीचा रस व अर्धा चमचा मध एकत्र करून घेतल्यास ॲलर्जीपासून बचाव व्हायला मदत होते.
त्वचेवरती ॲलर्जीचा त्रास जास्त होत असल्यास त्वचेला बाहेरून चंदन, वाळा, मंजिष्ठ, कडुलिंब इत्यादीसारख्या वनस्पतींनी तयार केलेली संतुलनची अभ्यंग मसाज पावडर वापरलेली जास्त उत्तम. शक्यतो कुठलेही केमिकल्स वापरण्यास टाळावे. त्वचेवर लावण्याकरिता संतुलनची क्रीम रोज व फार त्रास होत असल्यास तुलनचं पादाभ्यंग घृत लावलेले जास्त उत्तम.
अशा वेळेला पोट साफ होण्याकरिता अविपत्तीकर चूर्ण, सॅनकुल चूर्ण, त्रिफळा चूर्ण घेतलेलंसुद्धा फायदेशीर ठरू शकेल. याच बरोबरीने महामंजिष्ठादी गोळ्या, आसव, काढा घेण्याचासुद्धा फायदा होतो.
सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा कप दूध संतुलनचं अनंतकल्प घालून घ्यावं.
अंगाला लावण्याकरिता अभ्यंग कॉकोनट सरक एखादं सौम्य तेल घेतलेलं जास्त उत्तम.
पचनाला मदत होण्याकरिता छोटासा आल्याचा तुकडा सैंधव मिठाबरोबर घेऊन चावणे किंवा जेवल्यानंतर अन्नयोग पित्तशांतीसारख्या गोळ्या घेणे हेसुद्धा थोड्या दिवसांनी ॲलर्जीचा त्रास कमी व्हायला मदत करू शकतं.
तसेच नियमित अणू तेलाने किंवा नस्यस्यान घृताने नस्य केलेले फायदेशीर ठरते. येत असल्यास जल नेती केल्याचासुद्धा फायदा मिळू शकतो. निलगिरी तेलाचा वाफारा घेतल्यास सर्दी खोकल्यासारखे त्रास कमी व्हायला मदत मिळते.
शरीरशुद्धीकरिता प्राणायाम करण्याने सुद्धा फायदा मिळतो.
तसेच शक्य असल्यास आयुर्वेदिक पद्धतीने शरीरशुद्धी करून घेण्याकरिता शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या पित्तशामक बस्तींचा वापर केल्यानेसुद्धा फायदा मिळताना दिसतो.
सध्याच्या काळात ॲलर्जीकरिता एखाद्या व्यक्तीला ज्या विशिष्ट वस्तूंचा त्रास होतो त्या टाळणं ह्या उपायाबरोबरच steroids, antihistamines, immunotherapy वगैरे सारखे उपचार केले जातात. ज्यांचे दीर्घकाळात काही दुष्परिणामसुद्धा बघायला मिळतात. एवढेच नव्हे तर ती वस्तूसुद्धा जन्मभराकरिता वर्ज्य राहते. ॲलर्जीकडे अशा प्रकारचे धोरण असल्यामुळे पूर्वीच्या काळी एक दोन गोष्टींकरिता असलेली ॲलर्जी सध्याच्या काळात पंधरा वीस गोष्टींच्या ॲलर्जीमध्ये बदलत चाललेली आहे. श्री गुरू डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की, ज्या झपाट्याने सध्या ॲलर्जीचे प्रमाण सगळीकडे वाढतंय त्याच्याने पुढे जाऊन मनुष्याला मनुष्याची पण ॲलर्जी व्हायला लागली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे या ॲलर्जीपासून खरोखरीच वाचायचे असले तर शरीरातले अग्नी दोष कमी करणं, असात्म्यता कमी करणं व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे पालन करणं जास्त प्रभावी उपचार ठरू शकेल.