अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे असलेले संगमरवरी कचऱ्याचे डंपिंग यार्ड हे एक अद्भुत पर्यटन स्थळ बनले आहे. हे ठिकाण बर्फाळ टेकड्यांसारखे दिसते आणि काही लोक ते गुलमर्ग किंवा स्वित्झर्लंडसारखे असल्याचे मानतात. खरं तर, हे आशियातील सर्वात मोठे संगमरवरी डंपिंग यार्ड आहे, जे एक विषारी ठिकाण आहे. सध्या हे ठिकाण रील आणि फोटोशूटसाठी लोकांचे आकर्षण बनले असून दूरदूरवरून लोक येथे फोटो क्लिक करण्यासाठी येत आहेत.
या डंपिंग यार्डमध्ये 700 टँकर दररोज 22 लाख लिटर मार्बल स्लरीची विल्हेवाट लावतात. संगमरवरी कापताना, पीसताना आणि पॉलिश करताना हा जाड गाळ तयार होतो. ही जागा प्रत्यक्षात कचराकुंडी आहे, जिथे संगमरवरी संबंधित कचरा टाकला जातो.
येथे दररोज सुमारे 5000 पर्यटक येतात, तर वीकेंडला ही संख्या 20,000 पर्यंत पोहोचते. प्री-वेडिंग आणि फोटोशूटसाठी लोक इथे येतात. राजस्थानच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीने केलेल्या वैज्ञानिक अभ्यासात हे विषारी पर्यटन स्थळ घोषित केले आहे, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. कोणत्याही सुरक्षा व्यवस्थापनाशिवाय हे डम्पिंग यार्ड सुरू आहे.
पर्यावरण शास्त्राचे प्राध्यापक लक्ष्मीकांत शर्मा म्हणाले, 'येथे सुरक्षा तंत्रज्ञानाच्या अभावामुळे भूजल प्रदूषित झाले आहे, त्यामुळे शेतजमिनीवर परिणाम झाला आहे. धुळीमुळे प्रदूषण वाढत असून, येथे श्वास घेणेही धोकादायक झाले आहे. सरकारने ही जागा बंद करावी. अशा ठिकाणी खाद्यपदार्थांची दुकाने असणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असून, येथे कोणताही पर्यटन उपक्रम होऊ नये.