ढिंग टांग : येस, मि. प्रेसिडेंट..!
esakal April 03, 2026 09:45 AM

स्थळ : ओव्हल हपिस, व्हाइट हौस, वॉशिंग्टन. पात्रे : पोटस ऊर्फ डोलांडतात्या आणि त्यांना ‘पोटस’ असे छोटसं कोडनेम ठेवणाऱ्या सीआयएचे प्रमुख मि. जॉन रॅटक्लिफ.

पोटस : (डोळे मिटून) किती वाजले, मि. रॅटक्लिफ?

रॅटक्लिफ : (डोळे मिटूनच) सिक्स ओ झिरो झिरो!

पोटस : (डोळे किलकिले) सहा हजार वाजले?

रॅटक्लिफ : (सुस्कारा सोडत) हो!

पोटस : दॅट्स वंडरफुल! नाइस, ब्युटिफुल!! माझं नऊ वाजता भाषण होतं! ते झालं का?

रॅटक्लिफ : (रिपोर्टिंग करत) येस, मि. प्रेसिडेण्ट, तुम्ही ठरल्याप्रमाणे सायंकाळी नऊ वाजता जगाला उद्देशून भाषण केलंत! सांगायला आनंद वाटतो की त्याचा योग्य तो परिणाम झालाय!!

पोटस : (आनंदाने डोळे घट्ट मिटून) टेरिफिक, टेरिफिक! आय लाइक दॅट!! वंडरफुल!! कुणी केलं माझं भाषण?

रॅटक्लिफ : (एक पॉज घेत अवघडून) तुम्हीच, मि. प्रेसिडेण्ट!!

पोटस : (आनंदाने) वॉव! आय सी, मी काय बोललो भाषणात?

रॅटक्लिफ : (भाषणाचा रिपोर्ट देत) अफकोर्स मि. प्रेसिडेंट! मी नोट्स काढल्या आहेत! तुम्ही म्हणालात की इराणची मी वाट लावली आहे! त्यांच्याकडे आता ना युरेनियम आहे, ना नौदल, ना हवाई दल! आता आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही! ज्यांना कुणाला तेल हवं असेल त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करून घ्यावी! नाहीतर खड्ड्यात जावे! नाटो थर्डक्लास आहे! युरोपियन देश फोर्थक्लास आहेत! माझे विरोधक तर झेड क्लास आहेत! तुम्ही तुमची युध्द लढायची तर लढा, नाही तर मरा!

पोटस : (हर्षभराने) काय एकसे एक सुंदर वाक्य आहेत! खरंच हे सगळं मी बोललो?

रॅटक्लिफ : जवळपास असंच काहीसं! किंवा यापेक्षाही अधिक प्रभावी, मि. प्रेसिडेण्ट!

पोटस : आय गेस, माझ्या इतकं प्रभावी नेतृत्व सध्या पृथ्वीतलावर नसावं, व्हॉट यु से?

रॅटक्लिफ : (खाकरत) थोडी दुरुस्ती, मि. प्रेसिडेण्ट! पृथ्वीतलावर नव्हे, सूर्यमालिकेत असं म्हणणं सयुक्तिक होईल!

पोटस : (आडव्या केळ्याप्रमाणे ओठ फांकवत) वंडरफुल! बाय द वे, इराणनं शरणागती पत्करली का?

रॅटक्लिफ : (उभं राहून) जवळपास शरणागतीच! त्यांचे बिनीचे सगळे सैन्य अधिकारी मारले गेले तरी मान्य करायला तयार नाहीत! त्यांची युद्धाची खुमखुमी जिरत नाही! ते युद्धखोर आहेत, मि. प्रेसिडेण्ट! त्यांनी घाबरून आपली समझोत्याची अप्रत्यक्ष बोलणी फेटाळली! उलट जाम घाबरून युद्ध थांबवण्यासाठी आपल्यालाच अटी घातल्या आहेत! एकंदरित शरणागतीच!!

पोटस : (चौकशी करत) आपले युरोपियन देश काय म्हणतात? आफ्टरऑल अमेरिकेनं त्यांना वेळोवेळी मदत केली आहे!

रॅटक्लिफ : (ताठ उभं राहून) त्यांची भूमिका मैत्रीचीच आहे! इटलीनं त्यांची विमानतळं वापरायला नकार दिलाय! फ्रान्सनं केवळ मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या युद्धविमानांना मज्जाव केलाय, आणि इंग्लंडनं तर हे आमचं युद्ध नाही, असं सांगून टाकलंय! दे आर व्हेरी व्हेरी हेल्पफुल!!

पोटस : (डोळे बारीक करून) दॅट्स गुड! माझे इंडियाचे मित्र काय म्हणतात? त्यांना फोन करायला हवा! प्रेसिडेन्शियल ढोकळा संपलाय!

रॅटक्लिफ : (शांतपणाने) ढोकळ्याची सप्लाय चेन सध्या बंद आहे, मि. प्रेसिडेंट!! होर्मुझचा समुद्रमार्ग बंद असल्यामुळे ढोकळ्याची जहाजं येणं बंद झालंय!!

पोटस : (केस विस्कटून) ओह माय गॉड!!

रॅटक्लिफ : नाऊ व्हॉट नेक्स्ट, मि. प्रेसिडेंट?

पोटस : (मागे रेलून बसत) वेल, आता तरी मला नोबेल प्राइझ मिळेल का?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.