काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत एक धक्कादायक प्रकार उघड झाला. ‘सेटलमेंट’च्या नावाखाली एका महिला कर्मचाऱ्याकडे वरिष्ठाने शरीरसुखाची मागणी केली होती. डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलातील वरिष्ठ लिपिक भूषण पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पालिकेने त्याच्यावर कारवाई केली आहे. वरिष्ठांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने अखेर महिला कर्मचाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात भूषण पाटील विरोधात तक्रार नोंदवली होती. या घटनेने KDMC मधील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई का केली? असा संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी सवाल विचारला आहे. नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देत भूषण पाटीलने या महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पालिकेने भूषण पाटीलवरनिलंबनाची कारवाई केली आहे. ही घटना निवडणुकीच्या काळात घडली होती. राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणे 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी झाली. पीडित महिलेकडे सावित्रीबाई फुले कलामंदिरात उघडलेल्या एक खिडकी योजनेच्या ठिकाणी आवक-जावक रजिस्टर भरण्याचं काम दिलं होतं. 17 जानेवारीला भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी भूषण पाटील तिला भरपूर बडबडला होता.
तू मला काय देशील?
त्यानंतर तीन दिवसांनी 20 जानेवारीला भूषण पाटीलने रात्री आठच्या सुमारास पीडित महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्स अप कॉल केला. त्यावेळी भूषण पाटील पीडित महिलेला बोलला की, तुझ्याबरोबर अजून एकाला कामावरुन काढून टाकण्याचे वरिष्ठांनी मला आदेश दिले आहेत. त्याने माझ्याशी सेटलमेंट केलीय. तू मला काय देशील?. त्यावेळी महिलेने चॉकलेट देईन असं सांगितलं. त्यावर भूषण पाटीलने तिच्याकडे मला तुझ्याकडून शरीरसुख हवय अशी मागणी केली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला. पण काहीच कारवाई होत नसल्याने अखेर तिने मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं. तिथे गुन्हा दाखल झाल्यानंतर केडीएमसीने भूषण पाटीलला निलंबित केलं.