OTP With Silent Authentication: ऑनलाईन पेमेंटमध्ये आता OTP ची झंझट संपणार आहे. सायबर भामट्यांवर लगाम लावण्यासाठी बँक आणि टेलिकॉम कंपन्या एक नवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहे. आता व्यवहार करताना ग्राहकांच्या फोनची आणि सिमची ओळख लागलीच सिस्टिम करेल. एखादा सायबर ठग जर फसवणूक आणि सिम क्लोनिंगचा प्रयत्न करत असेल तर पेमेंट लागलीच थांबेल. ग्राहकांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहिल. काय आहे हे नवीन तंत्रज्ञान? ग्राहकांना काय होईल फायदा?
Online Payment करताना ओटीपीची प्रतिक्षा करणे आणि तो नंबर टाईप केल्यानंतर पुढील प्रक्रिया होणे ही पद्धत आता कालबाह्य होईल. कारण अनेकदा फोन हॅक करून हॅकर्स हे ओटीपी चोरतात आणि बँकेतील रक्कम काढून घेतात. त्यामुळे ओटीपीचा व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याप्रकाराला आळा घालण्यासाठी काही खासगी बँका आणि दूरसंचार कंपन्यांची बैठक झाली होती. त्यात एसएमएस (SMS) या पारंपारिक ओटीपी सिस्टिमद्वारे होणारी प्रक्रिया थांबवण्याचे ठरले तर सायलेंट ऑथिन्टिकेशन नावाची एक नवी प्रणाली आणण्याचे ठरले. ही प्रणाली पूर्वीच्या पद्धतीपेक्षा अधिक जलद आणि सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे. डिजिटल पेमेंटसाठी ही नवीन प्रणाली फायदेशीर मानली जात आहे.
विना OTP कसे होईल पेमेंट?
पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, मोबाईलवर विना ओटीपी बँकिंग संबंधीचे कामकाज पूर्ण होईल कसे? त्यासाठी सायलेंट ऑथिन्टेकशन प्रणाली कामी येईल. ही बँकग्राऊंड सुरक्षा प्रणाली आहे. यामध्ये ज्या काही टेलिकॉम कंपन्या आहेत, त्या रिअल टाईम माहिती शेअर करतील आणि पुढील व्यवहार प्रक्रिया पार पडेल. बँकिंग ॲप वापर असाल तर नवीन प्रणाली त्या मोबाईल मधील सिम कार्ड आणि ई-मेलची लागलीच पडताळणी करेल. त्यामुळे मोबाईल हॅक झाल्याचे लक्षात येईल आणि डिजिटल पेमेंट होणार नाही. गडबड वाटल्यास लागलीच पेमेंट थांबवले जाईल. विशेष म्हणजे ई-सिम e-SIM आल्यानंतर ऑनलाईन होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिम क्लोनिंग आणि eSIM स्वॅपिंग बंद
सायबर ठग हे अत्यंत चालाख असतात. ते सिम क्लोनिंग आणि eSIM स्वॅपिंगचा प्रयोग करतात. ते डप्लिकेट सिम तयार करतात. तर डिजिटल पद्धतीने ई-सिम स्वॅप करतात. त्यामुळे बॅकेचा ओटीपी सायबर भामट्यांच्या फोनवर जातो आणि ग्राहकांचे खाते खाली होते. त्यावर आता सायलेंट ऑथिन्टेकशन प्रणाली कामी येईल. तर या 1 एप्रिलपासून आरबीआयने टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा (2FA) नियम लागू केला आहे. आता एका पासवर्डच्या मदतीने व्यवहार होणार नाही. दोन वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार पूर्ण होईल.