मन-निर्मळ : तर्कहीन अंदाजाचे टोक
esakal April 04, 2026 09:45 AM

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

एखादी छोटी घटना घडते आणि आपण तिच्याभोवती भविष्यातले एक संपूर्ण चित्र उभे करतो. ‘काय होऊ शकते’ या विचाराऐवजी ‘काय नक्कीच होणार आहे’ असे गृहीत धरले जाते आणि तीही फक्त ‘वाईट शक्यता’!

जुनी गोष्ट. रेल्वेगाडीत एका तरुणासमोर एक श्रीमंत, उत्तम घड्याळ घातलेले गृहस्थ येऊन बसतात. डब्यात ते दोघेच असतात. मुलगा गृहस्थांना वेळ विचारतो, पण ते खिडकीबाहेर पाहात राहतात. मुलाने आधी त्यांना गार्डशी बोलताना ऐकलेले असते, त्यामुळे ते बहिरे/ मुके नाहीत, हे त्याला माहिती असते. तो पुन्हा थोड्या मोठ्या आवाजात विचारतो. तरीही काहीच प्रतिसाद येत नाही. शेवटी तो मुलगा थोडा चिडून म्हणतो, ‘‘मला फक्त वेळ जाणून घ्यायची आहे...’’ तेव्हा ते गृहस्थ म्हणतात, ‘‘हे पाहा, तुम्ही मला वेळ विचारता आहात आणि माझ्याकडे घड्याळ असूनही मी उत्तर देत नाही, हे मला माहिती आहे. का?...कारण मी स्वभावाने मैत्रीपूर्ण माणूस आहे. मी तुम्हाला वेळ सांगितली, तर आपले बोलणे सुरू होईल. मग आपण गप्पा मारू. आपले स्टेशन येईल तेव्हा मी तुम्हाला माझ्या घरी येण्याची ऑफर देईन. तुम्ही ती स्वीकारून माझ्या घरी याल. माझ्या मुलीला भेटाल. ती सुंदर आहे आणि तुम्हीही देखणे आहात. तुमची मैत्री होईल आणि तुम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घ्याल. एक दिवस सांगाल की तुम्ही दोघे लग्न करणार आहात... पण मला माझ्या मुलीचे लग्न अशा व्यक्तीशी करायचे नाही ज्याच्याकडे स्वतःचे घड्याळही नाही!’’

ही गोष्ट ऐकताना हसू येते. त्या गृहस्थांनी एका साध्या प्रश्नातून किती मोठी, तपशीलवार आणि शेवटी वास्तवापासून दूर अशी कथा तयार केली! पण थोडा विचार केला, तर लक्षात येते- आपणही आपल्या आयुष्यात असे बऱ्याचदा करत असतो.

राईचा पर्वत...

सकाळी उठल्यावर शरीर थोडे जड-जड वाटले किंवा डोके दुखायला लागले की लगेच विचार सुरू होतात- ‘‘हे गंभीर आजाराचे लक्षण तर नाही ना? काल वाचले होते तसे काही असेल का? टेस्ट करून घ्यावी का? कदाचित खूप उशीर झाला असेल...’’ किंवा एखादा छोटा रिपोर्ट थोडा वेगळा आला, की मन लगेच निष्कर्ष काढते, ‘‘हे नॉर्मल नाही. आता पुढे मोठा प्रॉब्लेम होणार... आयुष्य बदलून जाईल.’’ घरी कुणी थोडे शांत असले की वाटते, ‘‘नात्यात काहीतरी बिघडले आहे. सुरूवात अशीच होते...’’ किंवा मुला-मुलीने फोन उचलला नाही, की मन थेट वाईट शक्यतांकडे धाव घेते.

इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, घटना आपल्याला एवढे अस्वस्थ करत नाहीत, पण त्या घटनेवरून आपण तयार केलेले तर्कहीन भाकीत खूपच अस्वस्थ करते.

परिणाम

अशा प्रकारे विचार करणे आपल्या भावनांवर आणि निर्णयांवर खोल परिणाम करते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सर्वांत वाईट निष्कर्ष आधीच काढतो, तेव्हा भीती, चिंता, असुरक्षितता या भावना निर्माण होतात. शरीरातही त्याचा परिणाम जाणवतो. हृदयाची धडधड वाढते, लक्ष एकाच विचारावर/ शक्यतेवर अडकते आणि आपण सतत खात्री शोधत राहतो. मग निर्णयही त्याच दिशेने घेतले जातात. वारंवार गुगल करणे, अनावश्यक टेस्ट्स करणे किंवा उलट- पूर्णपणे डॉक्टरकडे जाणे टाळणे, लोकांशी स्पष्टपणे बोलण्याऐवजी मनातच कथा वाढवत राहणे, अतिरिक्त प्रतिक्रिया देणे, इ.

इथे भविष्याबद्दलचे तर्कहीन अंदाज, नियोजन आणि दृष्टी, यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

  • तर्कहीन अंदाज म्हणजे पुरावा नसताना, एखादा निकाल ‘नक्कीच असाच होणार’ अशी खात्री करून घेणे.

  • नियोजन म्हणजे वेगवेगळ्या शक्यता मान्य करून, ‘जर असे झाले तर मी काय करेन?’ असा विचार करून पुढचे पाऊल ठरवणे.

  • दृष्टी (व्हिजन) म्हणजे आपल्याला काय घडवायचे आहे, कोणत्या दिशेने जायचे आहे, याची स्पष्ट जाणीव ठेवणे.

गोंधळ कुठे?

आपण अनेकदा तर्कहीन अंदाज लावतो आणि त्यालाच अंतिम सत्य मानतो. इथेच गोंधळ होतो. कारण अंदाज ही फक्त एक शक्यता असतो, निश्चितता नाही. अंदाज लावण्यालाही मर्यादा असते आणि त्या मर्यादेतले अंदाज कधी उपयुक्तही ठरतात. उदा. लेखाच्या सुरूवातीच्या उदाहरणात ‘सहप्रवाशाशी बोलायला सुरुवात झाली, तर चर्चा वाढेल आणि माझी शांतता भंग होईल’ हा अंदाज वास्तवाच्या जवळ आहे. पण त्याच विचाराला पुढे नेत ‘तो माझ्या घरी येईल, मुलीची ओळख होईल, त्यांचे लग्न होईल’ ही अतिदूर, बिनबुडाची भाकिते ठरतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, की अंदाज वास्तवापासून जितका दूर जातो, तितका तो मनाला त्रासदायक ठरू शकतो. जवळच्या शक्यता कमी अस्वस्थ करतात; पण ‘जे नको तेच होईल’ या अतिदूर निष्कर्षापर्यंत पोहोचलो की भावनिक त्रास वाढत जातो. नियोजन आणि दृष्टी आपल्याला कृतीशील ठेवतात, आपल्याला पर्याय दाखवतात, पुढे जाण्याची दिशा देतात. पण बिनबुडाचे, पुराव्याशिवाय केलेले, वास्तवापासून दूर असलेले अंदाज आपल्याला अकार्यक्षम बनवतात, भीती वाढवतात, निर्णय थांबवतात.

अशा प्रकारे विचार करण्याची जर आपली सवय असेल आणि कधी अस्वस्थ वाटत असेल, तर स्वतःला थोडे साधे प्रश्न विचारून बघा-

  • मी आता नेमके काय गृहीत धरते/ धरतो आहे?

  • ते खरेच निश्चित आहे का? की मी फक्त बिनबुडाचे अंदाज लावते/ लावतो आहे?

  • याशिवाय अजून कोणते पर्याय असू शकतात?

  • हा विचार मला मदत करतोय की अडथळा निर्माण करतोय?

विचार थांबवणे शक्य नाही, पण त्यांची उलट तपासणी करणे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

ट्रेनमधल्या गृहस्थांनी भविष्याची भीती निवडली आणि वर्तमानातला एक साधा संवाद टाळला. आपण कदाचित इतक्या टोकाला जात नाही, पण आपल्या मनाने उभ्या केलेल्या भीतीमुळे, आपल्याकडून किती तरी साधे, सुंदर क्षण निसटून जातात!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.